डंख छोटा; धोका मोठा
By Admin | Published: April 24, 2016 11:43 PM2016-04-24T23:43:07+5:302016-04-25T00:51:16+5:30
औरंगाबाद : दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईने पाणी साठवून ठेवण्यावर नागरिकांचा भर दिसून येतो. परंतु अशा प्रकारे पाणी साठविताना डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे.
औरंगाबाद : दुष्काळामुळे निर्माण झालेल्या पाणीटंचाईने पाणी साठवून ठेवण्यावर नागरिकांचा भर दिसून येतो. परंतु अशा प्रकारे पाणी साठविताना डासांची उत्पत्ती होणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे. कारण अशा स्वच्छ पाण्यावर हिवतापाचे डास अंडी घालतात. शिवाय शहरातील विविध भागांमधील नादुरुस्त ड्रेनेजलाईन, साचलेली डबकी, तुंबलेल्या नाल्यांमुळेही डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागतो. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असताना प्रशासनाचे मात्र, त्याकडे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.
२५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन म्हणून साजरा केला जातो. हिवताप हा आजार ‘प्लासमोडियम’ या परोपजीवी जंतूपासून होतो. हे जंतू अॅनाफिलिस मादी डासाद्वारे प्रसारित होतात. जगात सर्वसाधारणपणे ३० ते ५० कोटी लोकांना दरवर्षी या रोगाची लागण होते. राज्यात हिवतापाच्या जंतूचे व्हायव्हॅक्स व फॅलसीफेरम हे दोन प्रकार प्रामुख्याने आढळून येतात. डासांच्या अळीचे नियंत्रण ही सर्वात महत्त्वाची कृती आहे. हिवतापासह डेंग्यू, चिकुन गुनियाचे डास स्वच्छ पाण्यात अंडी घालतात. सध्या पाणीटंचाईमुळे पाण्याची साठवण करण्यावर नागरिकांचा भर आहे. पाणी वाया न घालता ते अधिक दिवस साठविण्यावर नागरिकांचा भर आहे. परंतु पाणी झाकून न ठेवल्यास त्यावर हिवतापाचे डास अंडी घालण्याची शक्यता असते. साचलेली डबकी, रांजण, हौद, पाण्याच्या टाक्या, कूलर, रिकामे टायर, नारळाच्या करवंट्या इ. डासांच्या उत्पत्तीची स्थाने म्हणून पाहिली जातात. परंतु शहरात ठिकठिकाणी नादुरुस्त ड्रेनेजलाईन आणि त्यामुळे साचलेली डबकी दिसून येतात. त्याच्या दुरुस्तीकडे अनेक दिवस दुर्लक्ष केले जात असल्याने अशा ठिकाणीही डासांची उत्पत्ती होण्यास हातभार लागत आहे. परंतु अशा परिस्थितीकडे प्रशासन गांभीर्याने पाहायला तयार नसल्याचे दिसते. त्यातूनच नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे.