साडेतीनशे वर्षांपूर्वीच्या अवशेषांची ‘स्मार्ट’जपणूक !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:05 AM2021-08-14T04:05:32+5:302021-08-14T04:05:32+5:30
औरंगाबाद : जुने औरंगाबाद शहर कोणत्याही हल्ल्यापासून, अतिक्रमणापासून सुरक्षित रहावे म्हणून साडेतीनशे वर्षांपूर्वी पाच वेगवेगळ्या संरक्षण भिंती उभारण्यात आल्या ...
औरंगाबाद : जुने औरंगाबाद शहर कोणत्याही हल्ल्यापासून, अतिक्रमणापासून सुरक्षित रहावे म्हणून साडेतीनशे वर्षांपूर्वी पाच वेगवेगळ्या संरक्षण भिंती उभारण्यात आल्या होत्या. शहरीकरणामुळे हा ऐतिहासिक वारसा हळूहळू लुप्त पावत आहे. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनने हा वारसा अत्यंत ‘स्मार्ट’ पद्धतीने जपण्यास सुरुवात केली आहे. नौबत दरवाजा ते काळा दरवाजादरम्यान असलेल्या तटबंदीला गतवैभव प्राप्त करून देण्याचे काम सुरू आहे. विशेष बाब म्हणजे डागडुजीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जुन्या काळाप्रमाणेच आहे.
शहागंज येथील क्लॉक टॉवरच्या डागडुजीचे काम ज्या निकषांप्रमाणे करण्यात आले. तेच निकष किलेअर्कसाठी लावण्यात आले. संरक्षण भिंतीची जुनी माती कोरून काढण्यात आली. त्यानंतर तज्ज्ञांच्या उपस्थितीत कामाला सुरुवात झाली. डागडुजीसाठी वापरण्यात येणारे साहित्य कोणते असावे, हे सांगण्यात आले. चुना, विटांचे पावडर, डिंंक, गूळ, वेलपत्ता, मेथी, भेंडी, सिरस आदी साहित्य वाटून घ्यायचे. त्याला महिनाभर भिजायला ठेवायचे. त्यानंतर सर्व साहित्य लोखंडी भांड्यात ठेवून त्याला जाळायचे आणि मगच त्याचा वापर करण्याची मुभा दिली. नौबत दरवाजा परिसरात कंत्राटदाराने साहित्य तयार करण्याची भट्टीच तयार केली. संपूर्ण कामात सिमेंटचा वापर केलेला नाही. या कामामुळे संरक्षण भिंतीचे आयुष्य आणखी १०० वर्षांनी वाढले. नूतनीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या रंगरंगोटी करण्यात येत आहे. स्मार्ट सिटीकडून या कामावरही सुमारे ३२ लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. शहरातील ८ ऐतिहासिक दरवाजांची डागडुजीही २ कोटी रुपये खर्च करून करण्यात येत आहे.
संरक्षण भिंतीचा इतिहास
मुगल राजा औरंगजेब यांनी शहराच्या संरक्षणासाठी पाच वेगवेगळ्या प्रकारच्या संरक्षण भिंती उभ्या केल्या होत्या. प्रत्येक संरक्षण भिंतीला वेगळे नाव होते. शहर पनाह, किलेअर्क फसील (तटबंदी), बायजीपुरा फसील, बेगमपुरा फसील, नौखंडा फसील अशी नावे होती. प्रत्येक तटबंदीचे काही मोजकेच अवशेष आज पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी नागरिकांनी तटबंदी तोडून घरे बांधली आहेत.
स्मार्ट सिटीने पुढाकार घेतला
मागील अनेक वर्षांपासून आपण या संरक्षण भिंतीची वाताहत बघत होतो. स्मार्ट सिटीने किमान डागडुजीचा निर्णय घेतला ही आनंदाची बाब आहे. डागडुजीसाठी कोट्यवधींचा निधी लागणार नाही. दीड ते दोन कोटी रुपये खर्च केले तर जिथे जिथे अवशेष आहेत तेथे काम करता येईल.
डॉ. रमजान शेख, ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ.