स्मार्ट सिटी बसला चार वर्ष पूर्ण; आतापर्यंत दीड कोटी औरंगाबादकरांनी केला प्रवास
By मुजीब देवणीकर | Updated: January 23, 2023 20:31 IST2023-01-23T20:31:24+5:302023-01-23T20:31:57+5:30
शहर बससेवेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जाधववाडी परिसरात नवीन बसडेपो बांधण्यात येत आहे.

स्मार्ट सिटी बसला चार वर्ष पूर्ण; आतापर्यंत दीड कोटी औरंगाबादकरांनी केला प्रवास
औरंगाबाद : स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या शहर बससेवेला सोमवारी चार वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने बससेवेचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्ताने आजपासून महिलांसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली.
प्रशासक, सीईओ डॉ.अभिजीत चौधरी यांच्या मार्गदर्शनखाली सध्या ८० बस शहरातील विविध मार्गांवर धावत आहेत. आतापर्यंत बससेवेचा लाभ जवळपास दीड कोटी प्रवाशांनी घेतला. या काळात १५० बस स्थानक, ई-तिकीट, स्मार्ट कार्ड व अन्य सेवेचाही लाभ नागरिकांना मिळत आहे. शहर बससेवेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून जाधववाडी परिसरात नवीन बसडेपो बांधण्यात येत आहे. शहरात जी-२० अंतर्गत वुमेन-२०चे प्रतिनिधी मंडळ भेट देणार आहे. या निमित्ताने महिलांसाठी विशेष बससेवा सुरू करण्याबाबत घोषणा होणार आहे, तसेच चालक व वाहक यांना सुरक्षा, अपघातांसंदर्भात सूचना करण्यात येणार आहे. बस विभागाचे प्रमुख राम पवनीकर व सहयोगी प्रकल्प व्यवस्थापक ऋषिकेश इंगळे आदी काम पाहत आहेत.
३५ इलेक्ट्रिक बसची प्रतीक्षा
शहर बससेवेच्या पाचव्या वर्षी स्मार्ट सिटीतर्फे ३५ इलेक्ट्रिक बस सुरू करण्यात येणार आहेत. या बस वातानुकूलित असतील आणि स्वच्छ हवेसाठी महत्त्वाच्या ठरतील. या संदर्भातील प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
बस थांब्यांचा प्रश्न कायम
स्मार्ट सिटीने आतापर्यंत १५० बस थांबे उभारल्याचा दावा केला असून, त्यातील ६० टक्के बस थांब्यांवर कोणत्याही सुविधा नाहीत. चार प्रवासीही या स्थानकावर थांबू शकत नाहीत. बस थांबे दुरुस्तीसाठी कंत्राटदाराला नोटीस देण्यात आली होती. मात्र, आजपर्यंत एकही बस थांबा दुरुस्त केलेला नाही.