स्मार्ट सिटीचे सीईओ बाबासाहेब मनोहरे विभागीय चौकशीच्या फेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2021 04:02 AM2021-02-22T04:02:56+5:302021-02-22T04:02:56+5:30
औरंगाबाद : राज्य शासनाने औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सीईओपदी पदोन्नतीने नियुक्ती केलेले अधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी उस्मानाबादेत नगर परिषदेच्या मुख्य ...
औरंगाबाद : राज्य शासनाने औरंगाबाद स्मार्ट सिटीच्या सीईओपदी पदोन्नतीने नियुक्ती केलेले अधिकारी बाबासाहेब मनोहरे यांनी उस्मानाबादेत नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर काम करीत असताना मोठी अनियमितता केल्याचे उघडकीस आले. त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी सुरू करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे सादर केला आहे.
राज्य सरकारने एएससीडीसीएलच्या सीईओपदी बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केल्यानंतर महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी त्यांची नियुक्ती चुकीची असल्याचे म्हणत ती रद्द करण्याची मागणी केली होती. तूर्तास पालकमंत्री सुभाष देसाई यांनी ही नियुक्ती थांबवली आहे. यानंतरही मनोहरे यांनी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आपण रुजू झाल्याबद्दलचे पत्र महापालिका आयुक्तांच्या नावे दिले आहे.
एकीकडे त्यांच्या नियुक्तीमुळे वादळ उठलेले असताना मनोहरे उस्मानाबाद नगर परिषदेत मुख्याधिकारी पदावर असताना त्यांनी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेच्या कामात अनियमितता केल्याचे आरोप निश्चित झाले आहेत. यासंबंधीचा प्रस्ताव उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांना २९ जानेवारी रोजी दिला असून, त्यानुसार त्यांच्याविरोधात विभागीय चौकशी प्रस्तावित केली आहे, असे सूत्रांनी सांगितले.
आज रुजू होण्याची शक्यता
मनोहरे यांनी पत्रात म्हटले की, शासनाने माझी मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड, औरंगाबाद या पदावर नियुक्ती केली आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारी रोजी मी या पदावर रुजू होत आहे. या पत्राची प्रत मनोहरे यांनी नगर विकास विभागाचे प्रधान सचिव, नगर परिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालक, विभागीय आयुक्त औरंगाबाद, जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनाही दिली आहे. मात्र, प्रत्यक्षात मनोहरे कामावर रुजूच झाले नाही. रुजू न होताच त्यांनी परस्पर पत्र काढल्याचे समोर आले आहे.
राजकीय विरोध
बाबासाहेब मनोहरे यांना एएससीडीसीएलच्या सीईओपदी रुजू होऊ न देण्यासाठी शहरातील काही राजकीय पुढाऱ्यांकडून प्रयत्न सुरू आहेत. यात शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी तर मनोहरे यांना स्मार्ट सिटीच्या सीईओ पदावर बसू देणार नाही, असा इशाराच दिला आहे.