स्मार्ट सिटीच्या बैठकीस सापडला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 12:43 AM2017-11-12T00:43:18+5:302017-11-12T00:43:27+5:30
स्मार्ट सिटीचे मार्गदर्शक तथा उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी २९ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत स्मार्ट सिटीच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरची बैठक घेण्यास सहमती दर्शविली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : स्मार्ट सिटीचे मार्गदर्शक तथा उद्योग विभागाचे प्रधान सचिव सुनील पोरवाल यांनी २९ नोव्हेंबर रोजी औरंगाबादेत स्मार्ट सिटीच्या बोर्ड आॅफ डायरेक्टरची बैठक घेण्यास सहमती दर्शविली आहे.
स्मार्ट सिटीसाठी दिलेल्या निधीचा विनियोग कशा पद्धतीने करायचा, यावर निर्णय होत नाही. प्रकल्प सल्लागार समिती बैठका आयोजित करण्यासाठी पुढाकार घेत नाही. त्यामुळे शहर स्मार्ट करण्याची संपूर्ण प्रक्रियाच रखडली आहे.
शासनाने स्मार्ट सिटीच्या उपक्रमासाठी अगोदर अपूर्व चंद्रा यांची निवड केली होती. त्यांची बदली झाल्यानंतर पोरवाल यांची नियुक्ती करण्यात आली; मात्र आजपर्यंत ते औरंगाबादला बैठक घेण्यासाठी आलेच नाहीत. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर मुंबईला एका बैठकीनिमित्त गेले होते. त्यांनी पोरवाल यांची भेट घेतली.
पोरवाल यांनी २९ नोव्हेंबरला औरंगाबादेत बैठक घेण्यास सहमती दर्शविल्याचे मुगळीकर यांनी नमूद केले. ‘एसपीव्ही’ (स्पेशल पर्पज व्हेकल) माध्यमातून सोलार प्रकल्प आणि स्मार्ट लायटिंगच्या प्रकल्पांना मंजुरी द्यावी. शहर बसचा विषय योग्य आहे. त्यापूर्वी घनकचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ, हरित औरंगाबादला प्राधान्य द्या, असेही पोरवाल यांनी सांगितले. स्वच्छ आणि हरित शहराचा कृती आराखडा द्या, अशी सूचना त्यांनी केली. शहर बससंदर्भात ही सेवा नेमकी कोण चालविणार याची माहिती द्या, असेही त्यांनी आयुक्तांना सांगितले. सोलार प्रकल्प, स्मार्ट लायटिंग आणि घनकचरा व्यवस्थापन याबद्दलचे प्रकल्प अहवाल तयार आहेत, असे मुगळीकर यांनी सांगितले.