वीज मीटरमधील स्मार्ट चोरीने होऊ शकतो घरात कायमचा अंधार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 04:02 AM2021-08-26T04:02:27+5:302021-08-26T04:02:27+5:30
संतोष हिरेमठ औरंगाबाद : कोणी रिमोटद्वारे, तर कोणी मीटरची गती कमी करून वीज चोरी करतात. मात्र, वीज मीटरमध्ये फेरफार ...
संतोष हिरेमठ
औरंगाबाद : कोणी रिमोटद्वारे, तर कोणी मीटरची गती कमी करून वीज चोरी करतात. मात्र, वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास घरात कायमचा अंधार होऊ शकतो. महावितरणतर्फे धडक मोहीम राबवून मीटरमध्ये फेरफार करणाऱ्यांचा शोध घेतला जात आहे. अशा वीज ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करून दंडात्मक कारवाईबरोबर प्रसंगी गुन्हेही दाखल केले जात आहेत.
थेट आकडे टाकून वीज चोरी करणाऱ्यांसह स्मार्ट तंत्रज्ञानाचा वापर करून वीज चोरी करणाऱ्यांचा महावितरणकडून शोध घेतला जात आहे. मीटरची गती संथ करणारी तसेच मीटरमध्ये रिमोट कंट्रोलची कीट बसविणारी टोळी सक्रिय आहे. अशी स्मार्ट चोरी पकडली गेल्यास हजारो रुपयांच्या दंडात्मक कारवाईबरोबर गुन्हाही दाखल होऊ शकतो. मुदतीत बिल, दंड भरल्यास गुन्हा दाखल होणे टळू शकते.
वीज चोरी पकडल्यानंतर ग्राहकाला वीज चोरी केलेल्या युनिटनुसार बिलाची आकारणी करण्यात येते. सदर बिल न भरल्यास संबंधितांवर गुन्हाही दाखल होऊ शकतो. त्यामुळे मीटरमध्ये छेडछाड करू नये, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
-------
मीटरजप्ती आणि दंडात्मक कारवाई
१. वीज मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळल्यास मीटर जप्त करून महावितरणतर्फे मीटर टेस्टिंग लॅबमध्ये तपासणी केली जाते. त्यातून फेरफार केला की नाही, हे स्पष्ट होते.
२. फेरफार केलेल्या मीटरधारक ग्राहकाला अनुमानित वीज बिल दिले जाते. किमान दोन वर्षे ते कनेक्शनच्या तारखेपासूनचे वीज बिल दिले जाऊ शकते. विजेच्या भारानुसार दंड लावला जातो.
-----
कधीही होऊ शकते मीटरची तपासणी
- एखाद्या वीज ग्राहकाला नेहमीपेक्षा अचानक कमी वीज बिल येण्यास सुरुवात झाल्यास ती माहिती महावितरणच्या यंत्रणेत नोंदली जाते. अशावेळी ग्राहकाने वीज वापर कमी केला की मीटरमध्ये फेरफार केला, हे तपासले जाते.
- महावितरणतर्फे धडक मोहीम राबवून मीटरची तपासणी केली जाते.
- फेरफार केल्याची शक्यता असलेल्या प्रत्येक मीटरची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. फेरफार आढळला नाही तर संबंधित ग्राहकाचे वीज मीटर पुन्हा बसविले जाते.
------
फेरफार आढळल्यास कारवाई
महावितरणतर्फे सध्याही वीज मीटरची तपासणी करण्यात येत आहे. मीटरमध्ये फेरफार आढळल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल.
- भुजंग खंदारे, मुख्य अभियंता