शालेय साहित्य खरेदीसाठी धूम
By Admin | Published: June 16, 2014 12:08 AM2014-06-16T00:08:50+5:302014-06-16T01:18:02+5:30
जालना : सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षास प्रारंभ होत आहे.
जालना : सोमवारपासून नव्या शैक्षणिक वर्षास प्रारंभ होत आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सर्व काही हवे असल्याने रविवारी पुस्तकांच्या दुकानांसह इतर सर्वच शालेय साहित्य दुकानांत विद्यार्थी तसेच पालकांची दिवसभर मोठी गर्दी दिसून आली. बाजारपेठेत मोठा उत्साह होता.
पहिली ते आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना शाळेतून मोफत पाठ्य पुस्तके मिळणार आहेत. असे असले तरी पुस्तके सोडूनही इतर शालेय साहित्य विद्यार्थ्यांना घ्यावे लागते. त्यात प्रामुख्याने वह्या, रजिस्टर, दप्तरे, वॉटर बॅग, सॅक, शूज, पेन, कंपास, गणवेश आदींचा समावेश आहे. हे साहित्य खरेदी करण्यासाठी रविवारी जालना शहरातील विविध दुकानांमधून मोठी गर्दी होती. शालेय अनेक कंपन्यांचे शालेय साहित्य उपलब्ध असल्याचे यावेळी दुकानदारांनी सांगितले. शाळेत पाठ्यपुस्तके मिळत असली तरी इंग्र्रजी तसेच काही मराठी माध्यमांच्या पाठ्यपुस्तकांनाही मागणी आहे. वह्या, रजिस्टर व पेन व दप्तरांची मोठे रेंज आहे. वयोगटानुसार व वर्गानुसार दप्तराचे प्रकार उपलब्ध आहेत. पारंपरिक दप्तरासोबतच सॅक हा नवीन प्रकार आता शालेय विद्यार्थ्यांमध्ये प्रसिद्ध होत आहे. दीडशे रुपयांपासून पंधराशे रुपयांपर्यंत दप्तरे उपलब्ध असल्याचे दुकानदार सांगतात. दप्तरांसोबतच विविध पानी वह्या तसेच रजिस्टर उपलब्ध आहेत.
एक विद्यार्थी साधारणपणे दोन डझन वह्या सहज खरेदी करतो. टिफीन बॉक्स, वॉटरबॅग, कंपासपेटीलाही चांगलीच मागणी आहे. पारंपरिक साहित्याने आता नवे आकर्षक व प्लॉस्टिक कोटेड रुप धारण केले आहे. वह्यापासून व कंपासपेटीपर्यंतचा समावेश आहे. इयत्ता नववी व दहावीच्या पुस्तकांची मोठी उलाढाल होत आहे.
बालवाडी ते दहावीपर्यंतच्या सर्वच शाळा सोमपासून सुरु होत असल्याने पालकांनीही पाल्यांना अडचण नको म्हणून शालेय साहित्य खरेदीवर भर दिला आहे. रविवार असूनही बाजारपेठ उघडी होती.
वॉटर बॅग व कंपासपेटीवर असलेली कार्टून्स व डिझाइन्समुळे विद्यार्थ्यांना आकर्षित करीत आहे. कंपासपेटी चाळीस ते दोनशे रुपयांपर्यंत, वॉटर बॅगही ३० रुपयांपासून २०० रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. टिफिन बॉक्समध्येही अनेक चॉईस आहेत. प्लॅस्टिक, स्टील तसेच फायबरचे टिफिन आहेत. यातही आकर्षक रंगसंगती आहेत. विद्यार्थ्यांसाठी खास रचना करण्यात आल्याचे दुकानदार सांगतात. ५० ते ३०० रुपयांपर्यंत टिफिनची रेंज आहे. शालेय खरेदीसाठी बाजर फुलला असून पुढील आठवडाभर खरेदीसाठी गर्दी असेल असा अंदाज दुकानदार व्यक्त करीत आहेत. यातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल होणार आहे. (प्रतिनिधी)
गणेवशासाठी गर्दी...
मराठी तसेच इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे गणवेश खरेदसाठी पालकांनी आगाऊ नोंदणी केली आहे. पहिल्याच दिवशी गणेवश मिळावा अशी काही पालकांची इच्छा असते. त्यामुळे गणवेश दुकानांमधूनही पालक तसेच विद्यार्थ्यांची मोठी गर्दी दिसून आली. प्रत्येक शाळेच्या गणवेशानुसार व वयानुसार विविध किंमती आहेत.