पार्सलच्या नावाखाली हमसफर ट्रॅव्हल्समधून रोख रक्कम, गुटख्याचीही तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 07:50 PM2024-10-28T19:50:15+5:302024-10-28T19:50:23+5:30
हमसफर कार्यालयाच्या तपासणीत आश्चर्यकारक बाब उघड, गुटख्याचे पार्सलही सापडले
छत्रपती संभाजीनगर : ट्रॅव्हल्समधून पाठवल्या जाणाऱ्या पार्सलच्या बॉक्समधून रोख रक्कमेचीही तस्करी होत आहे. काही दिवसांपूर्वी सील केलेल्या हमसफर ट्रॅव्हल्स कंपनीच्या कार्यालयाच्या तपासणीत रविवारी ही धक्कादायक बाब उघडकीस आली.
१९ ऑक्टोबर रोजी शहरात नशेसाठी पुरवठा होणाऱ्या औषध विक्रीचे रॅकेट उघडकीस आले. ग्वाल्हेरपर्यंत या रॅकेटचे सूत्रे हाती लागले. या सर्व औषधांची तस्करी ट्रॅव्हल्स बसच्या माध्यमातून होत असल्याचे सबळ पुरावे निरीक्षक गीता बागवडे यांना मिळाले. त्यानंतर २१ ऑक्टोबर रोजी त्यांनी यात प्रमुख सहभाग असलेल्या हमसफर ट्रॅव्हल्स कंपनीचे क्रांती चौक येथील मुख्य कार्यालय सील केले. रविवारी बागवडे, उपनिरीक्षक अमोल म्हस्के, संदीप शिंदे यांनी कार्यालयातील संशयास्पद पार्सलची तपासणी केली. यात प्रामुख्याने एका पार्सलमध्ये गुटख्याचे पाच बॉक्स आढळून आले. त्यामुळे आता ट्रॅव्हल्समधून गुटख्याचीदेखील तस्करी सुरू झाल्याचे पाहून पोलिसही थक्क झाले.
ना सेंडर, ना रिसिव्हर
पार्सलपैकी एक बॉक्सवर पोलिसांना अधिक संशय आला. बॉक्सवर केवळ एका व्यापाऱ्याच्या नावाचा उल्लेख होता. दोन बॉक्स, त्यानंतर थर्माकॉल व त्याच्या आत १ लाख ७५ हजार रोख रक्कम ठेवलेली होती. विशेष म्हणजे, त्यावर पाठवणाऱ्याचा कुठलाही उल्लेख नव्हता. पाेलिसांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना याबाबत प्रश्न केल्यानंतर त्यांनाही समाधानकारक उत्तर मिळाले नाही. सर्व रक्कम, गुटखा पोलिसांनी जप्त केला. पैसे कोणी कोणाला पाठवले, कशासाठी पाठवले, याचा आता तपास केला जात आहे. अंमलदार संदीपान धर्मे, महेश उगले, विजय त्रिभुवन, कल्याण निकम, छाया लांडगे, ज्याेती भोरे यांनी ही कारवाई केली.