औरंगाबादेत एसआरपी भरतीत बनवाबनवी; दोघे कैद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:11 AM2018-03-31T00:11:25+5:302018-03-31T00:12:41+5:30
सातारा परिसरातील भारत बटालियन येथे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान बनवाबनवी करणाऱ्या दोन उमेदवारांचा चाणाक्ष अधिका-यांनी पर्दाफाश केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : सातारा परिसरातील भारत बटालियन येथे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेदरम्यान बनवाबनवी करणाऱ्या दोन उमेदवारांचा चाणाक्ष अधिका-यांनी पर्दाफाश केला. भरती प्रक्रियेचे चित्रण करणाºया व्हिडिओ कॅमे-यातही आरोपींची बनवाबनवी कैद झाली. याप्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दोन्ही उमेदवारांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
रमेश शांताराम दांडगे (चेस क्रमांक २८६३, रा. दहिगाव, ता. सिल्लोड) आणि अमोल लुकड वाणी (चेस क्रमांक २८६५, रा. दहिगाव, ता. कन्नड) अशी आरोपी उमेदवारांची नावे आहेत. सातारा पोलिसांनी सांगितले की, सातारा परिसरातील भारत बटालियन या राज्य राखीव दलातील रिक्त पदासाठी पंधरा दिवसांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे. १७ मार्च रोजी सायंकाळी ५ ते ६ दरम्यान सहायक समादेशक मोहंमद इलियास मोहंमद सईद (५४) यांनी उमेदवारांची मैदानी चाचणी घेतली. या मैदानी चाचणीदरम्यान उमेदवार रमेश दांडगे आणि अमोल वाणी यांच्यासह अन्य उमेदवारांचे धावण्याचे प्रात्यक्षिक घेतले.
यावेळी रमेश आणि अमोल यांनी संगनमत करून बनवाबनवी केल्याचे निदर्शनास आले. यावेळी रमेशने पळण्याचे टोकन घेतल्यानंतर तो अडीच किलोमीटर पळाला आणि त्याने त्याचे टोकन आरोपी अमोल लुकड याला देऊन त्याला पुढील अंतर पळायला सांगितले. त्यानुसार अमोल हा रमेशच्या वतीने अडीच किलोमीटर अंतर पळून त्याने रमेशला गुण मिळवून दिले. हा प्रकार मात्र त्यावेळी कर्तव्यावर असलेल्या अधिकाºयांच्या लक्षात आला नाही. मात्र त्या दिवशी आरोपीसोबत धावणाºया अन्य उमेदवारांना हा प्रकार माहीत असल्याने त्यांनी ही बाब वरिष्ठ अधिकाºयांच्या कानावर घातली. त्यानंतर भरती प्रक्रियेतील भरती अधिकाºयांनी त्या दिवशी केलेले व्हिडिओ चित्रण तपासले.
या चित्रणामध्ये आरोपींची बनवाबनवी त्यांच्या निदर्शनास आली. त्यांनी ही बाब आरोपींना कळू न देता त्यांना कार्यालयात बोलावून घेतले आणि याबाबत त्यांना जाब विचारला, तेव्हा ते उडवाउडवीची उत्तरे देऊ लागले. पोलीस दलात येण्यासाठी बनवाबनवी करणाºया या जवानांचा पर्दाफाश झाल्याने सहायक समादेशक शेख यांनी त्यांच्याविरोधात शुक्रवारी सातारा ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.
पोलीस दलात नव्हे लॉकअपमध्ये
पोलीस दलात भरती होण्यासाठी बेईमानी करणे दोन्ही उमेदवारांना चांगलेच महागात पडले. सातारा ठाण्यातील पोहेकॉ. ढोले यांनी दोन्ही आरोपींना अटक केली. पोलीस दलात जाण्याचे स्वपे्न उराशी बाळगताना फसवणूक केल्याने त्यांना थेट लॉकअपमध्ये जावे लागले.