"... म्हणून सर्व मंत्र्यांची व्यवस्था हॉटेलमध्ये केली"; कृषीमंत्री मुंडेंनी दिलं स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 01:03 PM2023-09-16T13:03:24+5:302023-09-16T13:04:53+5:30
छत्रपती संभाजीनगर शहरात एकूण येणाऱ्या सर्व मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकेल, असं कुठलंही शासकीय गेस्ट हाऊस नाही.
संभाजीनगर : राज्य सरकार शनिवारी छत्रपती संभाजीनगरात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संपूर्ण मंत्रिमंडळ येत आहे. तब्बल ७ वर्षांनंतर शहरात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट आहे. याशिवाय मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सव सांगता समारंभाच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला अतिशय महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, शासनाच्या दौऱ्यात मंत्र्यांच्या पंचतारांकीत मुक्कामावरुन टीका होत आहेत. त्यासंदर्भात आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुभेदारी ऐवजी पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबणार, यावरून विरोधकांनी टीका केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सुभेदारी विश्रामगृहात मुक्काम करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांच्या दौऱ्यातून स्पष्ट झाले. मात्र, इतर सर्व मंत्री पंचतारांकित हॉटेल मध्ये थांबणार आहेत. राज्यात एकीकडे दुष्काळाचे सावट असताना मंत्र्यांच्या राहण्यासाठी मोठा खर्च होत असल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर टीका केली जात आहे. त्यावर, आता कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी स्पष्टीकरण दिलंय.
छत्रपती संभाजीनगर शहरात एकूण येणाऱ्या सर्व मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था होऊ शकेल, असं कुठलंही शासकीय गेस्ट हाऊस नाही. ज्यावेळेस अशी व्यवस्था होणारी सरकारी यंत्रणा कुठेच नसेल, तर स्वाभाविक आहे, सरकारला येणाऱ्या सर्व मंत्र्यांची व्यवस्था कुठेतरी हॉटेलमध्येच करावी लागते, असे स्पष्टीकरण कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहे. तसेच, आजची बैठक ही मराठवाड्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरच घेतली जात आहे. त्यानुसार, मंत्रीमंडळ बैठकीनंतर हे सर्व निर्णय जाहीर केले जातील, असेही धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरन्यान, शहरातील स्मार्ट सिटीच्या कार्यालयात शहरातील पहिले भव्यदिव्य सभागृह उभारण्यात आले. त्यामुळे याच ठिकाणी मंत्रिमंडळ बैठक होणार आहे. मागील आठ ते दहा दिवसांपासून स्मार्ट सिटी कार्यालयाच्या परिसरात डांबरीकरण, रंगरंगोटी, कार्यालयातील साफसफाईवर भर देण्यात आला होता. या सभागृहात शनिवारी, दुपारी १२ ते ३:३० या वेळेत मंत्रिमंडळ बैठक होईल. सभागृहात १०० व्हीव्हीआयपी बसू शकतील, संपूर्ण सभागृह वातानुकूलित असून, येथे भव्य एलईडी स्क्रीन, अत्याधुनिक ध्वनिव्यवस्था, खुर्च्या इ. व्यवस्था आहे. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री यांच्यासाठी केबिनची सोय केली.
मंत्र्यांना जेवणासाठी व्हेज पदार्थ
शहरातील एका पंचतारांकित हॉटेलचे व्हेज जेवण मंत्र्यांसाठी मागविण्यात आले आहे. पंचतारांकित हॉटेलचे कर्मचारी जेवण वाढतील. पनीरच्या भाज्या, पोळी, गुलाबजाम इ. पदार्थ असल्याची माहिती सूत्रांनी दिली. व्हीव्हीआयपी वाहनांसाठी, कर्मचारी, भोजन व्यवस्था, पार्किंगसाठी आमखास मैदानावर सोय करण्यात आली. पाऊस आला, तरी कोणाला त्रास होणार नाही, याची काळजी मनपाने घेतली आहे.