जि.प., पं.स.साठी आतापर्यंत ९७ अर्ज दाखल
By Admin | Published: January 31, 2017 12:17 AM2017-01-31T00:17:40+5:302017-01-31T00:20:52+5:30
बीड :आतापर्यंत गटंसाठी ४७, गणांसाठी ५० अर्ज आले आहेत.
बीड : जिल्हा परिषदेच्या ६० गटासाठी व १२० पंचायत समिती गणासाठी आगामी १६ फेब्रुवारीला होत असलेल्या निवडणुकीसाठी शुक्रवारपासून आॅनलाईन पद्धतीने नामनिर्देशनपत्र दाखल करण्यास प्रारंभ झाला. आतापर्यंत गटंसाठी ४७, गणांसाठी ५० अर्ज आले आहेत. सोमवारी दिवसभरात ९३ जणांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, पहिल्या दोन दिवशी एकाही इच्छूकाने अर्ज दाखल केले नव्हते. रविवारी जिल्हा परिषद गटासाठी १ तर पंचायत समिती गणासाठी ३ असे एकूण ४ अर्जांची नोंद झाली. सोमवारी इच्छूकांनी आपले अर्ज भरण्यास गर्दी केली. दिवसभरात जिल्हा परिषद गटांसाठी ४६ तर पंचायत समिती गणांसाठी ४७ असे एकूण ९३ अर्ज दाखल केले.
दरम्यान, दोन दिवसांमध्ये एकूण ९७ अर्ज दाखल झाले असून बुधवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे शेवटच्या दोन दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल होणार आहेत. दरम्यान गेवराई तालुक्यातून सर्वाधिक ३४ उमेदवारी अर्ज दाखल झाले असून याखालोखाल बीड तालुक्यातून १९ अर्ज दाखल झाले आहेत तर पाटोदा तालुक्यातून अद्याप एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही.
बीड तालुक्यात मातब्बर रिंगणात
बीड तालुक्यात आतापर्यंत ११ उमेदवारांनी १९ अर्ज दाखल केले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ११ तर पंचायत समितीसाठी ८ जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. दरम्यान, नाळवंडी गटासाठी राष्ट्रवादीकडून अरूण डाके तर शिवसेनेकडून गणेश वरेकर यांनी प्रत्येकी दोन अर्ज दाखल केले आहेत. याशिवाय बहीरवाडी गटातून शिवसेनेच्या नवनाथ प्रभाळे यांनी तीन अर्ज दाखल केले असून पाली गटातून राष्ट्रवादीच्या उषा विश्वास आखाडे यांनी दोन अर्ज तर सुरेखा लिंबाजी घुगे यांनी अपक्ष अर्ज भरला आहे. नवगण राजुरी गटातून शेकापकडून गणेश भाऊसाहेब कोळेकर यांनी दावेदारी दाखल केली आहे. याशिवाय पंचायत समिती गणासाठी घोडका राजुरी गणातून उमीर्ला लांडे, कामखेडा गणातून शेकापच्या उर्मिला ज्ञानेश्वर काशीद, नाळवंडी गणातून शिवसेनेचे प्रल्हाद कांबळे, मांजरसुंबा गणातून भाजपच्या प्रतिभा कैलास गणगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. (प्रतिनिधी)