आतापर्यंत शिष्यवृत्तीचे २० टक्केच अर्ज प्राप्त; महाविद्यालयांच्या दिरंगाईची आयुक्तांकडून दखल
By विजय सरवदे | Published: January 27, 2024 02:52 PM2024-01-27T14:52:54+5:302024-01-27T14:53:06+5:30
मागील शैक्षणिक वर्षात अनुसूचित जातीच्या २९ हजार ४५४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला होता.
छत्रपती संभाजीनगर : समाज कल्याण विभागाच्या लॉगीनवर आतापर्यंत अवघे २० टक्के म्हणजे ५ हजार ७९२ एवढेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. यासंदर्भात महाविद्यालयांना वेळप्रसंगी नोटिसा द्या. सतत पाठपुरावा करा आणि त्यांच्या लॉगीनवर प्रलंबित अर्ज तत्काळ फॉरवर्ड करण्याच्या सूचना द्या. ज्यामुळे एकही विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहणार नाही, असे निर्देश समाज कल्याण विभागाचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी सहायक आयुक्तांना दिले.
चालू शैक्षणिक वर्ष सुरू होऊन आता सात-आठ महिन्यांचा कालावधी होत आहे. ऑनलाइन शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी ११ ऑक्टोबरपासून महाडीबीटी पोर्टल सुरू झाले. तीन महिन्यांनंतरही अद्याप शिष्यवृत्ती योजनेने गती घेतलेली नाही. केवळ छत्रपती संभाजीनगरच नव्हे, तर राज्यातील सर्वच जिल्ह्यांची सारखी परिस्थिती आहे. यासंदर्भात मंगळवारी (२३ जानेवारी) आयुक्त बकोरिया यांनी सर्व जिल्ह्यांच्या सहायक आयुक्तांची व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे बैठक घेऊन शिष्यवृत्तीपासून एकही मागासवर्गीय विद्यार्थी वंचित राहणार नाही, यासाठी महाविद्यालयांकडे सतत पाठपुरावा करून अर्ज मागवून घेण्याचे निर्देश दिले.
तथापि, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी. जी. वाबळे यांनी १८ जानेवारी रोजीच सर्व महाविद्यालयांना पत्र पाठवून आपल्या लॉगीनवर पडून असलेल्या शिष्यवृत्ती अर्जांची छाननी करून परिपूर्ण अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीनवर फॉरवर्ड करावेत. याशिवाय लॉगीनवर अर्ज प्रलंबित असल्याबद्दल खुलासाही सादर करावा, असे सूचित केले होते. त्यानंतर या दोन-तीन दिवसांत महाविद्यालयांकडून एक-दीड हजार अर्ज समाज कल्याणच्या लॉगीनवर प्राप्त झाले आहेत.
१० हजार ५३१ अर्ज छाननीविना पडून
मागील शैक्षणिक वर्षात अनुसूचित जातीच्या २९ हजार ४५४ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ देण्यात आला होता. या तुलनेत आतापर्यंत १६ हजार ३२३ विद्यार्थ्यांनीच महाडीबीटी पोर्टलवर अर्ज केले आहेत. त्यापैकी महाविद्यालयांनी तपासणी करून ५ हजार ७९२ परिपूर्ण अर्ज समाज कल्याण कार्यालयाच्या लॉगीनवर पाठविले आहेत. महाविद्यालयांच्या लॉगीनवर अद्यापही १० हजार ५३१ अर्ज पडून आहेत.