आतापर्यंत केवळ ४५ टक्के लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:05 AM2021-02-11T04:05:31+5:302021-02-11T04:05:31+5:30
औरंगाबाद : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना व दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली, ...
औरंगाबाद : जिल्ह्यात १६ जानेवारीपासून आरोग्य कर्मचाऱ्यांना व दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाइन वर्कर्सना कोरोना प्रतिबंधक लस देण्यास सुरुवात झाली, तरीही आरोग्य कर्मचाऱ्यांचे केवळ ४५ टक्के लसीकरण झाले. मर्यादित लसीकरण केंद्रे, भीती, जनजागृतीकडे होणाऱ्या दुर्लक्षाचा हा परिणाम आहे. त्यामुळे जिल्ह्यात नव्या केंद्रांची संख्या, खासगी रुग्णालयांच्या सहभागासह लसींचा पुरवठा, जनजागृती वाढविण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
जिल्ह्यात महिनाभरात लसीकरण केंद्रांची संख्या २६ झाली. त्यामुळे लसीकरणाची गती आणि संख्या वाढत नाही. शिवाय लसीकरणानंतर रिॲक्शन होण्याची भीती आहे. रक्तदाब, मधुमेह यांसह अन्य आजार असलेले कर्मचारीही अजूनही लसीकरणापासून दूर आहेत. मात्र लसीकरणाचे प्रमाण वाढावे, यासाठी आरोग्य यंत्रणा कोणतेही प्रयत्न करताना दिसत नाही.
----
जिल्ह्यात नोंदणी झालेले आरोग्य कर्मचारी- ३३,४६८
प्रत्यक्षात लस घेतलेले कर्मचारी- १५,१३८
लसीकरण केंद्रांची संख्या- २६
फ्रंटलाइन वर्कर्सचे झालेले लसीकरण- ३६१
--
नवीन केंद्रे सुरू करावीत
नवीन लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली पाहिजे. खासगी रुग्णालयांतही लसीकरण केंद्रे वाढविली पाहिजेत. लस घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे. रक्तदाब, मधुमेह, बायपास झालेले आरोग्य कर्मचारी मागे राहिले आहेत. त्यांनाही लस देता येते.
- डॉ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, आयएमए
जनजागृती वाढवावी
लसीमुळे भविष्यात काही त्रास होईल का, असा गैरसमज पसरलेला आहे. हा गैरसमज दूर होण्यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे. इंडियन मेडिकल असोसिएशनकडूनही लसीकरणाचे आवाहन केले जात आहे.
- डॉ. रमेश रोहिवाल, माजी अध्यक्ष, आयएमए
इतर आरोग्य सेवाही सुरू
साधारण फेब्रुवारी अखेरपर्यंत हे लसीकरण चालेल. सोबत दुसऱ्या टप्प्यातील लसीकरणही सुरू राहील. लसीकरणाबरोबर इतर आरोग्य सेवा आणि कार्यक्रमही सुरू आहेत.
-डॉ. विजयकुमार वाघ, जिल्हा लसीकरण अधिकारी
विभागीय आयुक्तांनी केली विचारणा
विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बुधवारी जिल्हा रुग्णालयात लस घेतली. यावेळी त्यांनी मनपा आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांना आरोग्य कर्मचारी लस का घेत नाहीत, अशी विचारणा केली, तेव्हा डॉ. नीता पाडळकर म्हणाल्या, गेले काही दिवस पोलिओ लसीकरण सुरू होते. आगामी दिवसांत जास्तीत जास्त आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होईल.