आतापर्यंत तरी भागले, उत्पन्नच नसल्याने एस. टी. कर्मचाऱ्यांचे होणार पगाराचे वांधे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:02 AM2021-05-22T04:02:02+5:302021-05-22T04:02:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : आतापर्यंत तरी भागले, कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे एस. टी.चे उत्पन्न पूर्णपणे थांबले असून, भविष्यात एस. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : आतापर्यंत तरी भागले, कोरोनाच्या कडक निर्बंधांमुळे एस. टी.चे उत्पन्न पूर्णपणे थांबले असून, भविष्यात एस. टी. कर्मचाऱ्यांच्या पगाराचे वांधे झाल्याशिवाय राहणार नाहीत.
सध्या एस. टी. महामंडळाचे उत्पन्न नसल्यात जमा आहे. अशास्थितीत कर्मचाऱ्यांचे पगार कसे करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य शासनाने एस. टी. महामंडळाला एक हजार कोटी रुपये दिल्याने मार्च आणि एप्रिल महिन्याच्या पगाराचा प्रश्न निर्माण झाला नाही. मात्र, लॉकडाऊन वाढत गेल्यास आणि उत्पन्न बंदच राहिल्यास या कर्मचाऱ्यांचे पगार करणे अवघड होणार आहे.
............................................
जिल्ह्यातील एस. टी.ची एकूण आगार - ८
एकूण कर्मचारी संख्या - २९००
महिन्याला पगारावर होणारा खर्च - ५ कोटी
सध्याचे रोजचे उत्पन्न - शून्य.
...........................................
कोणाकडे किती थकबाकी
आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पाण्यासाठी केलेल्या आंदोलनावेळी महामंडळाने पुरवलेल्या बस पोटीचे ७६ हजार रुपये महसूल विभागाकडून येणे.
निवडणुकांच्या काळात मतदान पेट्यांची ने-आण करण्यासाठी बसेस पुरविण्यात आल्या होत्या. त्याचे पैसे वसूल झालेले नाहीत.
....................................
...तर पगार होणे अवघड
राज्य शासनाने एक हजार कोटींची मदत केल्यामुळे आतापर्यंत तरी चिंता नव्हती. परंतु, आता उत्पन्नच घटल्यामुळे भविष्यात कर्मचाऱ्यांचे पगार होणेसुद्धा अवघड होऊ शकते.
- अरूण सिया, विभाग नियंत्रक, औरंगाबाद
....................................
मानव विकास मिशनकडून १९७ कोटी
ग्रामीण भागातील मुलींना बारावीपर्यंत शिक्षण घेणे शक्य व्हावे, याकरिता गाव ते शाळा या दरम्यान वाहतुकीची सुविधा उपलब्ध करुन देणे या योजनेंतर्गत एस. टी. महामंडळाच्या बसेसच्या आवर्ती खर्चाचे २०१३ ते २०२० या कालावधीतील ४२८ कोटी ८८ लाख ६२ हजार २०० रुपये मानव विकास विकास मिशन, औरंगाबादतर्फे देण्याचा निर्णय झाला. त्यापैकी पहिल्या टप्प्यात १९७ कोटी ५८ लाख चार हजार रुपये तसेच एस. टी.च्या बसेसमधून कर्तव्यार्थ प्रवास करणारे पोलीस, कारागृह कर्मचारी व कैदी यांच्या प्रवास खर्चापोटी २०१२ ते २०२० या कालावधीतील एकूण ६६ कोटी ६ लाख ४ हजार ४९४ रुपयेही प्राप्त झाल्याने उत्पन्न बुडाले असले तरी एस. टी. कर्मचाऱ्यांचे सध्या पगाराचे वांधे झालेले नाहीत. शिवाय मालवाहतुकीतून एस. टी.ला वर्षभरात ५६ कोटींचा महसूल प्राप्त झाला आहे.