...तर माझ्या मृत्यूला सरकार जबाबदार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:04 AM2021-02-24T04:04:27+5:302021-02-24T04:04:27+5:30
औरंगाबाद : मुंबई येथे कर्तव्य बजावताना कोरोना झाला. त्यातून बरे होऊन कामावर रुजू झाल्यानंतर पुन्हा मुंबईलाच ड्युटी ...
औरंगाबाद : मुंबई येथे कर्तव्य बजावताना कोरोना झाला. त्यातून बरे होऊन कामावर रुजू झाल्यानंतर पुन्हा मुंबईलाच ड्युटी देण्यात आली. या प्रकाराने संतप्त झालेल्या एसटी वाहकाने थेट आत्महत्येची धमकी दिली. वरिष्ठ माझे ऐकत नसल्याचे सांगत जर माझा मृत्यू झाला तर त्याला शिवसेना आणि हे सरकार जबाबदार असेल, असे त्याने एका व्हिडिओत म्हटले. हा व्हिडिओ सध्या समाज माध्यमात ‘व्हायरल’ झाला आहे.
किरण पांचाळ असे या कर्मचाऱ्याचे नाव असून ते औरंगाबाद येथील सिडको बसस्थानकामध्ये वाहक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी व्हिडिओमध्ये सांगितल्यानुसार, ५ जानेवारीला ते मुंबई येथे नियुक्तीवर होते. त्यानंतर परत आल्यानंतर त्यांना कोरोनाचे निदान झाले. उपचारानंतर ते पुन्हा १७ फेब्रुवारीस कामावर रुजू झाले. पण दुसऱ्याच दिवशी त्यांना पुन्हा मुंबई येथे कर्तव्य देण्यात आले. मात्र, आजारपणामधून बरे झाल्यानंतर लगेच पुन्हा मुंबई येथे काम करण्याची मानसिकता नसल्याने त्यांनी आपली नियुक्ती रद्द करावी, अशी विनंती वरिष्ठांना केली. परंतु, वरिष्ठांनी त्यांना मुंबईला जावेच लागेल असे सांगितले. यामुळे संतापलेल्या पांचाळ यांनी व्हिडिओद्वारे माझा मृत्यू झाला तर याला शिवसेना आणि सरकार जबाबदार असेल. माझी नियुक्ती रद्द झाली नाही तर मी आत्मदहन करेन, असा इशारा दिला आहे.
कर्तव्यासाठी शेवटी मुंबईला रवाना
हा व्हिडीओ तीन दिवसांपूर्वीचा आहे. त्यानंतर किरण पांचाळ हे कर्तव्यासाठी मुंबईला रवाना झाले आहे. याविषयी विभाग नियंत्रक अरुण सिया यांनी हा कर्मचारी कर्तव्यावर रवाना झाल्याचे सांगितले.