'...म्हणून मी पावसात भाषणाला उभा राहिलो'; रावसाहेब दानवेंची भरपावसात टोलेबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2020 07:11 PM2020-07-31T19:11:18+5:302020-07-31T19:11:40+5:30
आपसातील वादातून सरकारच्या गाडीचा अपघात अटळ आहे
औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते झाले. यावेळी दानवे यांच्या भाषणाच्या वेळी अचानक पावसाचे आगमन झाले. नेमकी संधी साधत दानवे यांनी, 'असे म्हणतात कि, पावसात भाषण केल्याने यश मिळते. कदाचित पुढचे संकेत असे असू शकतात. यामुळे पाऊस सुरु असताना मी भाषणाला उभा राहिलो अशी टोलेबाजी करत त्यांनी भाषणाला सुरुवात करताच उपस्थितांमध्ये हास्यकल्लोळ पसरला.
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे हे आपल्या अनोख्या भाषण शैलीसाठी चांगलेच प्रसिद्ध आहेत. भाषणात ग्रामीण भाषा, विविध उदाहरणांचा दाखला देत ते उपस्थितांची मने जिंकून घेतात. याचाच प्रत्येय शुक्रवारी सुद्धा आला. प्रसंग होता येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाचा.
कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना केंद्रीयमंत्री दानवे यांनी सरकारच्या कारभारावर जोरदार टीका केली. ते म्हणाले, या सरकारच्या कारभाराची स्टेरिंग दोघांच्या हातात आहे. ते कधी एकाच्या तर कधी दुसऱ्याच्या हातात असे सुरु असते. यामुळे या सरकारचा कधीही अपघात व्होऊ शकतो. राज्य कारभाराची स्टेरिंग एकाच्याच हातात राहिले तर जनतेचे प्रश्न सुटू शकतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.