‘... तर मीच येथून निघून जातो...’; भाजप नगरसेवकांत जुंपल्याने सावेंचा संताप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2019 06:30 PM2019-07-05T18:30:36+5:302019-07-05T18:55:52+5:30
‘तुम्ही शांत बसणार नसाल, तर मीच येथून निघून जातो...’ राज्यमंत्री सावे संतप्त
औरंगाबाद : पूर्व मतदारसंघातील नाल्यांचे आणि पाणीपुरवठ्याचे प्रश्न व इतर नागरी समस्यांचे निराकरण व्हावे, यासाठी उद्योग राज्यमंत्री अतुल सावे हे गुरुवारी महापालिकेत आले असता त्यांच्यासमोरच भाजप नगरसेवकांमध्ये श्रेयवादाची लढाई झाली. तुम्ही शांत बसणार नसाल तर मीच येथून निघून जातो, असा संताप व्यक्त करुन सावे यांनी नगरसेवकांना झापले. मनपा आयुक्त डॉ.निपुण विनायक यांच्या दालनातच हा प्रकार घडला.
सावे मनपात येण्यापूर्वी पाणी प्रश्न आणि नालेसफाईच्या मुद्यावरून गटनेते प्रमोद राठोड, नगरसेवक दिलीप थोरात, मनीषा मुंडे आदींनी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. पूर्व मतदारसंघातील समस्या मांडण्यासाठी सावे यांचे मनपात येणे आणि नगरसेवकांनी ठिय्या देणे या घटना सोबत झाल्या. पाणीपुरवठ्याप्रकरणी विशेष सभा घेण्याबाबत महापौर नंदकुमार घोडेले यांनी भाजप नगरसेवकांना आश्वासित केले होते. परंतु ती सभा न झाल्यामुळे भाजप नगरसेवक सत्तेत असतानाही त्यांनी आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या दिला. राज्यमंत्री मनपात आल्यानंतर नगरसेवकांसह ते आयुक्तांच्या दालनात गेले. तेथील बैठकीत मतदारसंघातील नाल्याच्या संरक्षक भिंतीचे काम तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. आयुक्तांशी चर्चा सुरू असतानाच नगरसेवकांमध्ये वाद वाढल्याने ते संतापले. प्रोटोकॉल मोडून येथे समस्या मांडण्यासाठी आलो आहे, मुद्दे सोडून इतरत्र चर्चा करून नका म्हणत ते नगरसेवकांवर मोठ्याने ओरडले. त्यांचा आवाज आयुक्तांच्या दालनाबाहेर आला. महापौरांसह औरंगाबाद पूर्व मतदारसंघातील शिवसेना-भाजप नगरसेवकांची यावेळी उपस्थिती होती.
नगरसेवकांमध्ये बेबनाव
आयुक्तांच्या दालनातच भाजप नगरसेवकांमधील बेबनाव समोर आला. समान पाणी देण्यासाठी आमच्या भागाला एक दिवस गॅप द्या, अशी भूमिका थोरात यांनी मांडली. त्यावर राठोड यांनी हा प्रशासनाचा विषय आहे. त्यामुळे तुम्ही कशाला मेहरबान होता. माझ्या भागाचा विषय मला मांडू द्या, असे थोरात यांना सांगितले. त्यामुळे थोरात संतापले. यातूनच वाद झाला. या वादात सुरेंद्र कुलकर्णी यांनीही उडी घेतली.
दीड दिवसात समान पाणीपुरवठ्याचा दावा
शहरात पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक कोलमडल्यामुळे नागरिकांमध्ये संताप आहे. यासंदर्भात नगरसेवकांसह नागरिकांनी माझ्याकडे तक्रारी केल्या. त्यामुळे आयुक्तांसोबत आज चर्चा केली. शहर अभियंता एस. डी. पानझडे यांच्यामार्फत शहरातील पाणीपुरवठ्याचा आढावा घेण्यात येणार आहे. दीड दिवसात समान पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिल्याचे सावे यांनी पत्रकारांशी बोलताना नमूद केले.