...तर शिवरायांच्या पुतळ्याचा भव्यदिव्य लोकार्पण सोहळा आम्ही करू; शिवजयंती महोत्सव समितीची आक्रमक भूमिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2022 07:40 PM2022-02-03T19:40:06+5:302022-02-03T19:43:38+5:30
मुख्यमंत्री किंवा शिवरायांचे वंशज आले तर आनंदच आहे. मात्र, कोणाला खूश करण्यासाठी घोळ घालून चालढकल अजिबात चालणार नाही
औरंगाबाद : गेल्या नऊ वर्षांपासून शिवप्रेमींनी पाठपुरावा, आंदोलने केल्यानंतर अखेर क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा विराजमान झाला असून, कारागिरांकडून सजावटीचे काम अंतिम टप्प्यात आहे. १९ फेब्रुवारीला शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्याचे नियोजन जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने केले आहे. त्यानुसार १८ फेब्रुवारीला सायंकाळी किंवा जयंती दिनी सकाळी शिवरायांच्या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा महापालिका प्रशासनाने करावा. चालढकल केली तर आम्हीच लोकार्पण करू, असे उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेतून बजावले.
यावेळी शिवजयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज पवार, यंदाचे अध्यक्ष अभिजित देशमुख, विनोद पाटील, राजेंद्र जंजाळ, मनोज पाटील, डी. एन. पाटील, राजू शिंदे, समीर राजूरकर, अनिल मानकापे, शिवाजी दांडगे, राजगौरव वानखेडे, नवीन ओबेरॉय, किशोर शितोळे व पदाधिकारी उपस्थित होते.
शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. ११ फेब्रुवारी सकाळी १०.३० वा. वेरुळच्या गढीवर ध्वजारोहण, दि. १३ ला हडको येथे सकाळी १० वाजता वृक्षारोपण करण्यात येईल. दि. १३ ते १९ दरम्यान सकाळी ८.३० ते ११.३० या वेळेत क्रांती चौक येथे प्रा. चंद्रकांत भराट यांच्या संयोजनात छत्रपती शिवचरित्र पारायण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. दि. १५ ला सकाळी महापुरुषांच्या पुतळ्यांची साफसफाई करण्यात येईल. दि. १७ ला नंदनवन कॉलनी येथे सकाळी ११ वाजता विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येईल, तर भगतसिंगनगर, हर्सूल येथे किल्ले बनवा स्पर्धा सकाळी ११ वाजता होईल. दि. १८ व १९ ला सायकल रॅली सकाळी ६.३० वा. क्रांती चौक येथे होईल. दि. १८ ला क्रांती चौक येथे सकाळी १० ते ५ या वेळेत पुस्तक प्रदर्शन भरवण्यात येईल. दि. १९ ला सायं. ६ वाजता क्रांती चौकात दीपोत्सवाचे आयोजन रेखा बहाटुळे, तनश्री चव्हाण, मनीषा मराठे, सुवर्णा मोहिते यांच्या पुढाकाराने करण्यात आले आहे. रात्री ११.३० वाजता आतषबाजी करण्यात येईल. सकाळी ९.३० वा. मास्क व सॅनिटायझर वाटप करण्यात येईल. सकाळी ९ वाजता महाराजांच्या पुतळ्याजवळ ध्वजारोहण करण्यात येईल.
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला किंवा जयंतीदिनीच क्रांती चौकातील पुतळ्याचा लोकार्पण सोहळा पालिकेने आयोजित करावा. कोणाला बोलवायचे हा मनपा प्रशासनाचा अधिकार आहे. मुख्यमंत्री किंवा शिवरायांचे वंशज आले तर आनंदच आहे. मात्र, कोणाला खूश करण्यासाठी घोळ घालून चालढकल अजिबात चालणार नाही, असा इशारा विनोद पाटील यांनी दिला आहे. यासंदर्भात ते मनपा प्रशासकांना लवकरच भेटणार आहेत.