...तर मग शेकडोंचा विनामास्क संचार असणारी महापालिका सील करणार का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 01:54 PM2020-11-28T13:54:49+5:302020-11-28T13:56:40+5:30
मास्क न घालता येणाऱ्या ग्राहकाला सामान देताना आढळून आल्यास त्या संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल व १५ दिवस दुकान सील करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला.
औरंगाबाद : महानगरपालिका, जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज शेकडो लोक विना मास्क फिरतात मग काय तुम्ही महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय १५ दिवस सील करणार का? असा सवाल व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
मनपाचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी मंगळवारी बैठक घेतली. शहरात कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. मास्क न घालता येणाऱ्या ग्राहकाला सामान देताना आढळून आल्यास त्या संबंधित दुकानदारावर कारवाई करण्यात येईल व १५ दिवस दुकान सील करण्यात येईल, असा इशारा आयुक्तांनी दिला. या संदर्भात व्यापारी महासंघाचे महासचिव लक्ष्मीनारायण राठी यांना विचारले असता त्यांनी प्रतिसवाल केला की, कोणत्या ना कोणत्या कामामुळे दररोज महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालयात दररोज शेकडो लोक विना मास्क ये- जा करीत असतात. मग काय प्रशासक मनपा किंवा जिल्हाधिकारी कार्यालय १५ दिवस सील करणार का. सर्व व्यापारी स्वतःची व ग्राहकांची काळजी घेत आहेत. पण काही ग्राहक असे आहेत की, ते विना मास्क येतात व त्यांना अडवले तर ते भांडण करतात. अशा ग्राहकांना रोखण्यासाठी दुकानदार काय करणार.
महासंघाचे अध्यक्ष जगन्नाथ काळे यांनी सांगितले की, ग्राहक ऐकत नसेल, विना मास्क फिरत असेल तर त्याचा दंड दुकानदाराला कशासाठी. मनपाने व पोलिसांनी शहरातील विविध भागात काही दिवस एकत्रित मोहीम राबवून विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी. मग ती व्यक्ती कोणीही असो. मात्र, दुकाने १५ दिवस बंद ठेवणे हे अन्यायकारक आहे.