सोशल मीडिया आले औरंगाबादकरांच्या मदतीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 01:14 AM2017-09-01T01:14:36+5:302017-09-01T01:14:36+5:30
कोणी गाडीत, कोणी स्टेशनवर, कोणी आॅफिसमध्ये तर कोणी कमरे व छातीइतक्या पाण्यात अडकले. त्यामध्ये अनेक औरंगाबादकरदेखील होते. आपले नातलग, मित्र, सहकाºयांची चिंता त्यांना सतावत होती. अशा वेळी औरंगाबादकरांच्या मदतीला धावून आले ते फेसबुक!
मयूर देवकर ।
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गेल्या तीन दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाने थैमान घातले आहे. रात्रंदिवस धावणारी मुंबई थांबली. मुंबईच्या रस्त्यांवर महापूर आल्याने लाखो लोक अडकून पडले. कोणी गाडीत, कोणी स्टेशनवर, कोणी आॅफिसमध्ये तर कोणी कमरे व छातीइतक्या पाण्यात अडकले. त्यामध्ये अनेक औरंगाबादकरदेखील होते. आपले नातलग, मित्र, सहकाºयांची चिंता त्यांना सतावत होती. अशा वेळी औरंगाबादकरांच्या मदतीला धावून आले ते
फेसबुक!
आपले मित्र-नातेवाईक कुठे आहेत, त्यांना मदत हवीय का, आपण काय मदत करू शकतो याची माहिती आदान प्रदान करण्यासाठी फेसबुकने ‘द फ्लडिंग इन मुंबई’ नावाने सेफ्टी चेक पेज तयार केले आहे. त्यावर युजर मदत मागू आणि मदत देऊही शकतात. जेथे अडकलेले आहात त्या जागेचे नकाशानुसार स्थळ (लोकेशन) या पेजवर शेअर करण्याची सोय होती. हजारो फेसबुक युजर्सने या सेवेचा उपयोग करून मदत मागितली आणि दिलीसुद्धा. त्यामुळे केवळ ‘टाईमपास’ करण्याचा कट्टा म्हणून बदनाम असलेले फेसबुक संकटसमयी मदतकार्यात प्रभावी भूमिका बजावू शकतो हे दिसून आले.
२९ आॅगस्ट रोजी फेसबुकने हे सेफ्टी पेज सुरू केले. यामध्ये ‘सुरक्षित आहात किंवा नाही’ हे पर्याय निवडून युजर त्यांची सुरक्षितता कळवू शकतो. संपूर्ण राज्यातून लोक मुंबईत असलेल्या किंवा काही कामानिमित्त तेथे गेलेल्या मित्रांना ‘सुरक्षित असल्यास विचारा’ हा पर्याय वापरून त्यांची चौकशी करीत आहेत. संपर्क व माहिती प्रसारणाचे प्रभावी माध्यम म्हणून फेसबुकचा एक वेगळाच वापर यातून दिसून आला.