सोशल मिडियातून मैत्री, प्रेम, फसवणूकीचा शेवट थेट कारागृहात; अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ
By सुमित डोळे | Published: May 2, 2024 07:48 PM2024-05-02T19:48:45+5:302024-05-02T19:48:58+5:30
तीन महिन्यात ८७ गुन्हे दाखल, अत्याचाराच्या ८० टक्के प्रकरणांना प्रेमसंबंधाची मोठी किनार
छत्रपती संभाजीनगर : सोशल मीडियातून मैत्री, अल्लड प्रेम, खोटे आश्वासन आणि फसवणुकीच्या रागातून बहुतांश प्रेमप्रकरणांचा शेवट कारागृहात हाेत आहे. गेल्या तीन महिन्यात शहर व जिल्ह्यात अत्याचाराचे ८७ गुन्हे दाखल झाले. गेल्या २० दिवसांमध्ये २० पेक्षा अधिक तरुणींनी प्रियकराकडून अत्याचार झाल्याची तक्रार दाखल केली. यातील जवळपास ८० टक्के गुन्ह्यात पीडिता व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीतलेच असल्याचे निरीक्षणही पोलिस नोंदवतात. मात्र, महिलेच्या तक्रारीनंतर गुन्हा व अटक अटळ असल्याने ८० पेक्षा अधिक तरुणांवर कारागृहात जाण्याची वेळ आली.
विनयभंग, छेडछाडीच्या गुन्ह्यात दिवसेंदिवस वाढत होत आहे. दुसरीकडे अत्याचाराच्या घटनांचा आलेखही ८ वर्षांमध्ये वाढला. असल्याचे पोलिसांच्या अहवालातून निदर्शनास येत आहे. शहरात चिकलठाणा परिसरात काही महिन्यांपूर्वी रेकॉर्डवरील गुन्हेगारांनी प्रार्थनास्थळातून घरी जात असलेल्या विवाहितेला निर्मनुष्य परिसरात नेऊन सामूहिक हिंस्र पद्धतीने अत्याचार करून हत्या केली होती. वाळूज परिसरात अपंग व्यक्तीकडून चिमुकलीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची घटना घडली. मात्र, बहुतांश घटनांमध्ये ओळखीतल्याच व्यक्तीकडून अत्याचार, विनयभंग होत असल्याचे प्रमाण यात सर्वाधिक असल्याचेही तपासात निष्पन्न होत आहे.
एप्रिल महिन्यात वाढ
जानेवारीत ६ अत्याचाराचे गुन्हे दाखल झाले तर एप्रिल महिन्यात हाच आकडा १५ पर्यंत पोहोचला. त्याशिवाय ३ बाललैंगिक अत्याचाराचे तर २३ विनयभंगाचे गुन्हे दाखल झाले. २०२० च्या संपूर्ण वर्षात अत्याचाराच्या ८४ गुन्ह्यांची नोंद होती. ती २०२४ च्या एप्रिल अखेर ४७ पर्यंत पोहोचली. एकूण तीन महिन्यांमध्ये बाललैंगिक अत्याचाराचे १४ प्रकरण उघडकीस आले.
शहरात अत्याचाराच्या घटनांचा आलेख
वर्ष २०१९ २०२० २०२१ २०२२ २०२३ २०२४ (एप्रिल अखेर)
अत्याचार ८५ ८४ ८८ ९९ १०२ ४७
विनयभंग ३०१ २४५ १९९ २९२ ३६९ ६५
ग्रामीणमध्येही मार्चमध्ये मोठी वाढ
मार्च महिन्यात जिल्ह्यात ७ अत्याचाराच्या तर अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याच्या घटना उघडकीस आल्या. यात जानेवारीत दाखल ४ अल्पवयीन अत्याचाराच्या गुन्ह्यात ५ आरोपींना अटक झाली. तर, फेब्रुवारीच्या ३ घटनांमध्ये तीनही आरोपी अटकेत आहे. मार्च महिन्यात १० गुन्ह्यांमध्ये ७ आरोपी कारागृहात गेले.
जानेवारी फेब्रुवारी मार्च
अत्याचार ७ ६ १७
विनयभंग १७ ३४ २७
जिल्ह्यातील अल्पवयीन मुलींच्या गुन्ह्यांचा आलेख
जानेवारी फेब्रुवारी मार्च
अत्याचार ४ ३ १०
विनयभंग ५ ५ ५
जवळच्यांकडूनच घात, प्रेमसंबंधाची मोठी किनार
२०२४ मध्ये शहर पाेलिस दलात दाखल अत्याचाराच्या जवळपास सर्वच घटनांमध्ये आरोपी व पीडिता एकमेकांच्या ओळखीचे असल्याचे निष्पन्न झाले. त्याला प्रेमसंबंधाची मोठी किनार होती. लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याच्या तक्रारींची संख्या तुलनेने अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. यात वय वर्षे २० ते ३५ वयोगटातील तरुण, तरुणींचे प्रमाण अधिक आहे. दाखल गुन्ह्यांपैकी ८० टक्के गुन्ह्यात पीडिता व आरोपी हे एकमेकांच्या ओळखीचे, मित्र मैत्रिण किंवा प्रेमसंबंधातील असल्याचे निरीक्षणही पोलिसांनी नोंदवले.
नंतर तथ्य राहत नाही..
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महिलांच्या तक्रारीत पहिले एफआयआर दाखल करणे बंधनकारक आहे. परंतु, बहुतांश अत्याचाराच्या प्रकरणात गुन्हा दाखल झाल्यानंतर तथ्य नसल्याचे निष्पन्न होते. नुकतेच छावणीत दाखल अल्पवयीन अत्याचार प्रकरणात देखील मुलीने तक्रार मागे घेण्यासाठी न्यायालयाकडे दाद मागितली. अशात अनेक प्रकरणात तक्रारदार न्यायालयात तक्रार मागे घेण्यासाठी प्रतिज्ञापत्र दाखल करतात. बहुतांश प्रकरणांना समोरच्याची सामाजिक प्रतिष्ठा पणाला लावणे, फ्रस्टेशन ऑफ लव्ह किंवा फसवणुकीची किनार असते.
- ॲड. अभयसिंग भोसले, विधिज्ञ