ऊसतोड कामगारांसाठी सामाजिक सुरक्षा योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2018 05:15 AM2018-10-21T05:15:57+5:302018-10-21T05:16:12+5:30
राज्यातील ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना’ लागू करण्यात आली आहे.
औरंगाबाद : राज्यातील ऊसतोड कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी ‘लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार सामाजिक सुरक्षा योजना’ लागू करण्यात आली आहे. राज्यात सुमारे १०१ सहकारी क्षेत्रातील व ८७ खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्यांत अंदाजे आठ लाख ऊसतोड कामगार काम करतात. त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना याचा लाभ होणार आहे.
ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी गुरुवारी राष्टÑसंत भगवानबाबांची जन्मभूमी असलेल्या सावरगाव येथे दसरा मेळाव्यात तशी घोषणा केली होती. २४ तासांत तसा शासननिर्णय जारी झाला आहे. केंद्र शासनाच्या असंघटीत कामगार सामाजिक सुरक्षा अधिनियम, २००८ अंतर्गत विशिष्ट योजनांचा लाभ देण्याकरिता महाराष्टÑातील ऊसतोड कामगारांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. योजनेंतर्गत प्राथमिक टप्प्यात विविध प्रशासकीय विभागांच्या अंतर्गत सुरू असलेल्या घर बांधणी, वृद्धाश्रम व शैक्षणिक योजनांकरिता प्रशासकीय विभागांनी ऊसतोड कामगार व त्यांच्या कुटुंबियांकरिता निधी उपलब्ध करून देणे बंधनकारक असणार आहे.
घरबांधणी योजनेमध्ये इंदिरा आवास योजना, शबरी आवास योजना, प्रधानमंत्री आवास योजना, रमाई नागरी/ग्रामीण आवास योजना इ. योजनांचा प्रथम टप्प्यात समावेश केला आहे. शैक्षणिक योजनेमध्ये विमुक्त जाती व भटक्या जातीकरिता शालेय शिक्षण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा समावेश करण्यात आला आहे.