वाढत्या तक्रारींची दखल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 12:06 IST2025-03-26T11:29:52+5:302025-03-26T12:06:36+5:30
जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींकडून विविध प्रकरणात केलेल्या अनियमिततेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

वाढत्या तक्रारींची दखल, समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली
छत्रपती संभाजीनगर : वाढत्या तक्रारींची दखल घेऊन समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त जयश्री सोनकवडे यांची बदली करण्यात आली आहे. मागील दोन वर्षांपासून त्या या पदावर कार्यरत होत्या. आता त्यांचा पदभार छत्रपती संभाजीनगर येथील उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य दीपक खरात यांच्याकडे जाणार आहे
सहसचिव सो. ना. बागुल यांच्या सहीने या दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले आहेत. बदलीच्या आदेशाची अंमलबजावणी तत्काळ व्हावी असे त्यात म्हटले आहे. दरम्यान जयश्री सोनकवडे यांनी या बदलीला मॅटमध्ये आव्हान देण्याचे ठरवले आहे. बदली झाल्यानंतर एक पोस्ट जयश्री सोनकवडे यांनी फेसबुकच्या माध्यमातून व्हायरल केली होती. मात्र नंतर ती डिलिट केली. या पोस्टमध्ये त्यांनी ही बदली माझ्यावर अन्यायकारक असल्याचे म्हटले होते.
कामकाजाबाबत लोकप्रतिनिधी व जनतेत तीव्र नाराजी
बदली आदेशाच्या प्रस्तावनेत सो. ना. बागुल यांनी म्हटले आहे की, जयश्री सोनकवडे यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधींकडून विविध प्रकरणात केलेल्या अनियमिततेबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तसेच त्यांची बदली करण्यासाठी निवेदने मिळाली आहेत. सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागांतर्गत अनुसूचित जातीच्या प्रवर्गसाठी विविध योजना राबवण्यात येतात. योजनांची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. सोनकवडे यांच्या कामकाजाबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी दाखल होत असून कामकाजाबाबत लोकप्रतिनिधी व जनता तीव्र नाराजी व्यक्त करीत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज सुरळीत होण्यासाठी त्यांची बदली शासनाच्या विचाराधीन होती.
सामाजिक न्याय मंत्र्यांना निवेदन
दरम्यान, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (राजरत्न आंबेडकर) शहराध्यक्ष प्रमोद ढाले यांनी या बदलीचे स्वागत केले आहे. त्यांनी पत्रकात म्हटले आहे की सोनकवडे यांची बदली व्हावी यासाठी आम्ही वरिष्ठांना व सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना निवेदने दिली होती. सोनकवडे या मागासवर्गीयांची कामे जाणीवपूर्वक करीत नव्हत्या. अर्जदारांची काहीही त्रुटी नसताना त्या कर्जप्रकरणे प्रलंबित ठेवत असत.