कार्यकर्त्यांना अन्नधान्य वाटपासाठी परवानगी नाही; गल्लीत गप्पा मारणारांवरही होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2020 07:37 PM2020-07-09T19:37:36+5:302020-07-09T19:38:47+5:30
शहरातील कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी ९ दिवसांचा लॉकडाऊन अत्यंत महत्त्वाचा आहे.
औरंगाबाद : दि.१० ते १८ जुलैदरम्यान अन्नधान्य वाटप करणाऱ्यांना पास दिले जाणार नाहीत, असे स्पष्ट करीत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी संचारबंदी अत्यंत कडक असल्याचे नमूद केले.
शहरातील कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी ९ दिवसांचा लॉकडाऊन अत्यंत महत्त्वाचा आहे. अत्यावश्यक सेवा आणि खूपच महत्त्वाचे अथवा वैद्यकीय कारणास्तव घराबाहेर पडणे आवश्यक असेल ती व्यक्ती सोडली तर कुणालाही घराबाहेर पडण्यास परवानगी नसेल. परवानगी घेऊन बाहेरगावाहून शहरात येणाऱ्यास प्रवेश दिला जाईल.
मात्र, अपवादात्मक परिस्थिती वगळता कोणालाही शहराबाहेर जाण्यास ई-पास दिला जाणार नाही. गत लॉकडाऊन कालावधीत अन्नधान्य कीट, जेवणाचे डबे वाटप करण्यासाठी दानशूरांना परवानगी देण्यात आली होती. गरजूंना डबे न देता गुरुवारी एक दिवसात गहू, तांदूळ, आटा , खाद्यतेल असे रेशन वाटप करावे. १० ते १८ दरम्यान अन्नवाटप करण्यासाठी कुणालाही परवानगी मिळणार नाही. नागरिकांनी या कालावधीत घराबाहेर पडू नये, पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस आयुक्तांनी केले.
अत्यावश्यक सेवेतील अधिकारी, कर्मचारी, डॉक्टर, औषधी दुकानदार आणि पासधारक प्रसारमाध्यम प्रतिनिधी यांनाच लॉकडाऊन काळात कामानिमित्त घराबाहेर पडता येईल. शहर पोलीस दलातील सुमारे ८० टक्के जवान रस्त्यावर असतील, असे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला पोलीस उपायुक्त मीना मकवाना, सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे उपस्थित होते.
गुन्हे नोंदविणार, दंडात्मक कारवाईसुद्धा
शहरातील नागरिकांनी ९ दिवस घराबाहेर पडणे टाळावे. विनाकारण दुचाकी घेऊन घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर संचारबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा आणि साथरोग नियंत्रण कायद्याच्या कलमानुसार गुन्हे दाखल केले जातील आणि दंडात्मक कारवाई होईल.
गल्लीत गप्पा मारणारांवरही कारवाई
लॉकडाऊन काळात रस्ते सुनसान असतात. मात्र, गल्लीत टोळके गप्पा मारत बसतात. ही बाब लक्षात घेऊन गल्लीबोळांत गप्पा मारणाऱ्या लोकांवर कारवाई केली जाईल. प्रथम त्यांचे समुपदेशन केले जाईल.नंतर प्रसंगी गुन्हे नोंदविण्यात येतील.