समाजाला संत विचारांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:04 AM2021-07-24T04:04:31+5:302021-07-24T04:04:31+5:30
चिंचोली लिंबाजी : संत हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात, आज खऱ्या अर्थाने देशाला संत विचारांची गरज असल्याचे स्पष्ट ...
चिंचोली लिंबाजी : संत हे समाजाला दिशा देण्याचे काम करतात, आज खऱ्या अर्थाने देशाला संत विचारांची गरज असल्याचे स्पष्ट करीत नारायणदेव बाबा यांचे जीवनकार्य आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्राला ऊर्जा देणारे आहे. त्यांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘लीलामृत’ ग्रंथ समाजाला प्रेरणादायी ठरेल, असे प्रतिपादन महसूल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी श्री क्षेत्र वाकी येथे केले. श्रीक्षेत्र शिवेश्वर देवस्थान (वाकी, ता. कन्नड) येथे शुक्रवारी गुरू पौर्णिमेचे औचित्य साधून सद्गुरू नारायणदेव बाबा यांच्या जीवन चरित्रावर आधारित ग्रंथाचे विमोचन त्यांच्या हस्ते झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
नारायणदेव बाबा यांनी वाकी परिसरात जवळपास ११ मंदिरांची उभारणी करून त्यांचा जीर्णोद्धार करण्याचे काम केले. या देवस्थानच्या विकासासाठी प्रस्ताव आल्यावर श्रीक्षेत्र वाकी देवस्थानाला ‘ब’ दर्जा प्राप्त करून देवू, यासोबतच भव्य सभागृहासाठी २५ लाखांचा निधी देण्याची ग्वाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. ग्रंथ हे जीवनाचे कल्याण करण्यासाठी दिशा देतात. नारायणदेव बाबा यांनी त्याग शिकवला. ‘लीलामृत’ फक्त वाचून चालणार नाही, याचे दैनंदिन जीवनात आचरण गरजेचे असल्याचे मत सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे यांनी यावेळी व्यक्त केले.
यावेळी जिल्हा बँकेचे चेअरमन नितीन पाटील, उपाध्यक्ष अर्जुन गाढे, देवस्थानचे उत्तराधिकारी ह.भ.प. नामदेव महाराज पल्हाळ, लीलामृत ग्रंथाचे लेखक लक्ष्मण महाराज पल्हाळ, सेवानिवृत्त प्राचार्य नामदेवराव चापे, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे, डॉ. संजय जामकर, अवचित वळवले, सुखदेव महाराज, कृष्णा लहाने, प्रा. समाधान गायकवाड, राजेंद्र ठोंबरे, तहसीलदार संजय वाडकर, पोलीस निरीक्षक हरीश बोराडे आदी उपस्थित होते.
--- छायाचित्र