समाजाला नेत्यांच्या स्मारकांपेक्षा शाळा, महाविद्यालये हवी आहेत: इम्तियाज जलिल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 03:18 PM2022-07-02T15:18:37+5:302022-07-02T15:19:10+5:30
‘मै मनकी नही, दिलकी बात करना चाहता हूं ’:
औरंगाबाद : ‘मै मन की नही, दिल की बात करता हूं’, असं म्हणत व त्या अनुषंगाने अनेक उदाहरणे देत शुक्रवारी खासदार इम्तियाज जलिल यांनी वसंतराव नाईक महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची मने जिंकली.
वसंतराव नाईक यांच्या १०९ व्या जयंती निमित्त महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित अभिवादन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य राजाराम राठोड होते, तर डॉ. गफ्फार कादरी यांचीही यावेळी प्रमुख उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
खा. जलिल म्हणाले, मी तर विरोधी पक्षाचा खासदार आहे. पण, तुमच्यासारखी जनता हीच माझी ताकद आहे. त्या ताकदीच्या भरवशावर मी प्रयत्नांची शिकस्त करीत असतो. २०१४ मध्ये जोखीम घेऊन विधानसभा लढली. जिंकलो. २०१९ मध्ये जोखीम पत्करूनच लोकसभा लढली. प्रयत्न केला तर यश पदरी पडतेच. आज समाजाला शाळा, महाविद्यालये हवी आहेत. नेत्यांच्या स्मारकांपेक्षा समाजोपयोगी गोष्टी घडल्या पाहिजे यावर भर दिला व आज शहराला आठ- आठ दिवस पाणी येत नाही, याला आपणही जबाबदार आहोत, असे ते म्हणाले.
अध्यक्षीय समारोपात राजाराम राठोड म्हणाले, जाती धर्माने देश मोठा होणार नाही. खऱ्या अर्थाने लोकांचे राज्य आले पाहिजे. धर्मनिरपेक्षता महत्त्वाची आहे. आज तीच नाहीशी होत आहे. वसंतराव नाईक हे पाच वेळा त्या काळात आमदार म्हणून निवडून आले. मागासवर्गीयांना शिक्षण मिळावं, ही त्यांची प्रारंभापासूनची भूमिका होती. सर्वांना सोबत घेऊन चालण्याची ताकद त्यांच्यात होती, याकडे त्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधले. प्राचार्य जगदीश भराड यांनी प्रास्ताविक केले. संस्थेचे उपाध्यक्ष ॲड. अभय राठोड यांचेही यावेळी भाषण झाले. मंचावर संस्थेचे सचिव नितीन राठोड, कोषाध्यक्ष डॉ. बिपीन राठोड यांची, तसेच प्रा. अजित दळवी, प्रा. अनुया दळवी, प्राचार्य मदनसिंग राठोड, प्रा. फुलसिंग जाधव, आदींची विशेष उपस्थिती होती. प्रा. सुभाष चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. प्रवीण बोबडे यांनी आभार मानले.