सॉफ्टवेअरने निवडले ‘पेट’ परीक्षेचे प्रश्न
By Admin | Published: July 16, 2017 12:22 AM2017-07-16T00:22:54+5:302017-07-16T00:35:16+5:30
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेत (पेट-४) प्रश्नपत्रिका न काढता सॉफ्टवेअरने विचारलेलेच प्रश्न सोडवावे लागले.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या पीएच.डी. प्रवेश परीक्षेत (पेट-४) प्रश्नपत्रिका न काढता सॉफ्टवेअरने विचारलेलेच प्रश्न सोडवावे लागले. यात मुख्य विषयातील विविध उपविषयांच्या दिलेल्या अभ्यासक्रमापैकी एकाच विषयाचे सर्वाधिक प्रश्न विचारण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यामुळे उपविषयांच्या भारांकालाच (सर्व उपविषयांना समान मूल्य देणे) फाटा दिल्याचे स्पष्ट झाले. सर्व विद्यार्थ्यांना समान काठीण्य पातळीचे प्रश्न विचारण्यात आले नाहीत. यातच ऐनवेळी निगेटिव्ह गुण देण्याच्या पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत आहे.
विद्यापीठ प्रशासनाने प्रयोगांवर प्रयोगाची मालिका सुरूच ठेवली आहे. पदव्युत्तर प्रवेशासाठी विषयानुसार सीईटी न घेता थेट विद्याशाखेनुसार घेतली. यातही विधि शाखेला प्रवेश घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना भलत्याच शाखेची प्रश्नपत्रिका सोडवावी लागली. हा गोंधळ कमी होत नाही तोच पेट-४ मधील गोंधळ समोर आला आहे. पेट-४ परीक्षा विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील १७ परीक्षा केंद्रांवर सुरळीतपणे पार पडली. मात्र, या परीक्षेत प्राध्यापकांनी सेट केलेल्या प्रश्नपत्रिकांद्वारे प्रश्न विचारण्यात आले नसल्याचे स्पष्ट झाले.
५९ विषयांसाठी घेण्यात आलेल्या पेट परीक्षेसाठी सर्व विषयांच्या प्राध्यापकांकडून प्रश्न मागविण्यात आले होते. या प्रश्नाची विषयांनुसार ‘क्वश्चन बँक’ तयार केली. एका विषयाच्या हजार प्रश्नांचे एकत्रीकरण केल्यानंतर त्यातील ५०-५० प्रश्नांचे गट करण्यात
आले.
या गटातील प्रश्न सॉफ्टवेअरनेच विद्यार्थ्यांना परीक्षेत विचारले असल्याचे अधिष्ठातांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. यात एका विषयातील उपविषयांचे समान प्रश्न विचारण्यात आले नाहीत.
उदाहरणार्थ, अर्थशास्त्र विषयातील सूक्ष्म, स्थूल, भारतीय अर्थव्यवस्था, बँकिंग, लोकसंख्या, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या शाखांचे किरकोळ प्रश्न विचारण्यात आल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. मात्र, याच विषयातील सांख्यिकीय अर्थशास्त्राचे तब्बल १०० पैकी ५० पेक्षा अधिक प्रश्न विचारण्यात आले. यामुळे विद्यापीठाने पेट परीक्षेची घोषणा केल्यानंतर जाहीर केलेल्या अभ्यासक्रमातील सर्व उपविषयांना दिलेल्या भारांकालाच हरताळ फासण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले.