शेतजमिनीचे आरोग्य तपासा अन् उत्पादन खर्चात बचत करा
By बापू सोळुंके | Published: April 30, 2024 08:01 PM2024-04-30T20:01:42+5:302024-04-30T20:04:19+5:30
शेत जमिनीचा पोत पाहूनच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करावा, यासाठी केंद्र सरकारने ‘स्वाईल हेल्थ मिशन’ ही योजना आणली आहे.
छत्रपती संभाजीनगर : जास्तीतजास्त उत्पादन मिळावे यासाठी दरवर्षी शेतकरी शेतात भरमसाट रासायनिक खतांचा मारा करीत असतात. मात्र, यामुळे बऱ्याचदा गरज नसताना जमिनीमध्ये रासायनिक खतांची मात्रा अधिक होते. परिणामी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत पिकावरील खर्च अधिक होतो. ही बाब टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आधी माती परीक्षण करावे, जमिनीची आरोग्य पत्रिका पाहूनच खताचे नियोजन करण्याचा सल्ला कृषी विभागाच्या जिल्हा मृद चाचणी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.
शहरातील शहानूरवाडी येथे जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या कॅम्पसमध्येच जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालयात कार्यरत आहेत. अत्याधुनिक माती परीक्षण प्रयोगशाळा आहे. मातीचे परीक्षण करण्यासाठी तंत्रज्ञ आणि अन्य अधिकारी कार्यरत आहेत. शेत जमिनीचा पोत पाहूनच शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर करावा, यासाठी केंद्र सरकारने ‘स्वाईल हेल्थ मिशन’ ही योजना आणली आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील गावे निवडण्यात आली. गतवर्षी जिल्ह्यातील ६ हजार ४८० माती नमुन्यांचे परीक्षण करण्याचे लक्ष्य जिल्हा मृद चाचणी अधिकाऱ्यांना देण्यात आले होते. ३१ मार्चपर्यंत हे उद्दिष्ट पूर्ण केले. शिवाय राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गतही २ हजार ३१० माती नमुन्यांचे परीक्षण करण्यात आल्याची माहिती जिल्हा मृद चाचणी अधिकारी भीमराव वैद्य यांनी दिली. वैद्य म्हणाले, “शेतकऱ्यांनी दरवर्षी शेतातील माती नमुन्याचे परीक्षण करून घेणे आवश्यक आहे. शेतजमिनीची आरोग्य पत्रिका आमच्या कार्यालयाकडून तयार करून घेतल्यानंतर जमिनीचा पोत कसा आहे, याची माहिती मिळते. जमिनीमध्ये अस्तित्वात असलेले घटक आणि कोणत्या घटकांची कमतरता आहे, याची माहिती मिळते. यामुळे रासायनिक खतांचा अनावश्यक वापर टाळता येतो.
माती परीक्षणामुळे फायदा
दरवर्षी शेतकऱ्यांनी माती परीक्षण करावे, मार्च ते मे अखेरपर्यंत माती नमुने प्रयोगशाळेकडे देऊ शकतात. माती परीक्षणामुळे जमिनीतील नत्र, स्फुरद आणि पालाश, सल्फर, जस्त तसेच लोह, झिंक इ. घटकांची माहिती मिळते. यासोबतच शेत जमिनीतील सेंद्रिय कर्बचे प्रमाणही कळते. जमिनीत सेंद्रिय कर्बच नसेल तर रासायनिक खतांचा कितीही वापर केला तरी त्याचा पिकाला लाभ होत नाही. अनावश्यक रासायनिक खतांचा वापर टाळता येतो. परिणामी, उत्पादन खर्च कमी होतो.
- भीमराव वैद्य, जिल्हा मृद चाचणी अधिकारी