३९ लाखाची जागा साडेपाच लाखात विकली; बनावट कागदपत्रांआधारे गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी केली फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 1, 2021 07:13 PM2021-02-01T19:13:22+5:302021-02-01T19:30:07+5:30
crime news संसथेच्या मालकीचा ३८ लाख ९१ हजार रुपये किमतीचा भूखंड बनावट ठरावाद्वारे केवळ ५ लाख ४५ हजार १०० रुपयांना नातेवाइकांना विक्री केला.
औरंगाबाद: बनावट कागदपत्रांच्या आधारे सहकारी गृहनिर्माण संस्थेचा ३९ लाख रुपये किमतीचा प्लॉट केवळ साडेपाच लाखात विकून फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला. ही फसवणूक २०१३ ते २०२० या कालावधीत पडेगावातील युवान को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीत घडली. याविषयी छावणी पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
अजीज शमशोद्दीन सुराणी, उमेद अमुलक मोती, सिराज शेर मोहम्मद चारनिया, अब्दुल्ला शमशोद्दीन सुराणी, रफिक रजबअली हिराणी आणि उपनिबंधक अंबिका झळके अशी आरोपींची नावे आहेत. तक्रारदार रहिम रफिक अली मोती हे पडेगाव येथील युवान गृहनिर्माण हाउसिंग सोसायटीचे सभासद आहेत. २०१३ ते २०१४ याकाळात सुराणी, मोती, चारनिया आणि हिराणी अशा पाच जणांनी उपनिबंधक अंबिका झळके यांच्याशी संगनमत करून बनावट ठराव पास करून घेतला. त्यानंतर त्यांनी संसथेच्या मालकीचा ३८ लाख ९१ हजार रुपये किमतीचा भूखंड बनावट ठरावाद्वारे केवळ ५ लाख ४५ हजार १०० रुपयांना नातेवाइकांना विक्री केला.
हा प्रकार समजल्यावर रहिम यांनी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडे कागदपत्रांची मागणी केली होती. तेव्हा त्यांनी सामाजिक कार्यासाठी भूखंड कमी किमतीत विक्री केल्याचे सांगितले; मात्र त्यांनी कागदपत्रे देण्यास टाळाटाळ केल्याने शेवटी त्यांनी याविषयी उपनिबंधक कार्यालयातून कागदपत्रे मागितली. यानंतर याविषयी उपनिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदविली. तक्रार प्राप्त होताच उपनिबंधक यांनी याविषयी पोलिसांत तक्रार करण्याचे निर्देश दिले. हे निर्देश प्राप्त होताच रहिम यांनी छावणी ठाण्यात आरोपीविरुद्ध तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, फौजदार सचिन वायाळ तपास करीत आहेत.