अधीक्षक कार्यालयात निवृत्त फौजदारास भोवळ
By Admin | Published: February 27, 2017 12:39 AM2017-02-27T00:39:36+5:302017-02-27T00:41:27+5:30
बीड : मुलाच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणुन दररोज हेलपाटे मारूनही प्रशासन दखल घेत नसल्याने मुलाच्या माता-पित्याने रविवारी सकाळी अधीक्षक कार्यालय गाठले.
बीड : मुलाच्या मृत्यूची चौकशी व्हावी म्हणुन दररोज हेलपाटे मारूनही प्रशासन दखल घेत नसल्याने मुलाच्या माता-पित्याने रविवारी सकाळी अधीक्षक कार्यालय गाठले. दीर्घ प्रतिक्षेनंतरही कुणीच दखल न घेतल्याने मुलाचे वडील बेशुद्ध होऊन कोसळले. विशेष म्हणजे ते निवृत्त सहायक फौजदार आहेत.
शेख नखीम असे त्यांचे नाव असून, त्यांना पोलिसांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांचा मुलगा शेख अलीम याचा ३ मे २०१६ रोजी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूची चौकशी करावी अशी मागणी शेख नखीम व त्यांची पत्नी खैसर बेगम करत आहेत. सातत्याने शहर ठाण्यात हेलपाटे मारूनही दखल घेतली जात नसल्याने शेख दाम्पत्य अधीक्षकांच्या भेटीला आले होते. अधीक्षक जी. श्रीधर कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यांच्या दालनाबाहेर शेख दांपत्य ताटकळत थांबले होते. दोन तासानंतर शेख नखीम हे बेशुद्ध पडले. यावेळी कर्मचाऱ्यांनी त्यांना झोळीतून जिल्हा रुग्णालयात हलविले.
उप अधीक्षक गणेश गावडे यांनी तातडीने जिल्हा रुग्णालय गाठून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. या संदर्भात योग्य ती चौकशी केली जाईल, असे गावडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. तशा सूचना शहर ठाण्याच्या अधिकाऱ्यांना दिल्या असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)