एकमेव आधार कोरोनाने नेला; या पालकांना मदत कोण करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:04 AM2021-06-09T04:04:06+5:302021-06-09T04:04:06+5:30
केंद्र व राज्य शासनाची निराधार पाल्यांना मदत करण्याची घोषणा राम शिनगारे औरंगाबाद : देशात शेकडो मुलांचे आई-वडील कोरोनाच्या महामारीत ...
केंद्र व राज्य शासनाची निराधार पाल्यांना मदत करण्याची घोषणा
राम शिनगारे
औरंगाबाद : देशात शेकडो मुलांचे आई-वडील कोरोनाच्या महामारीत मृत्यू पावले आहेत. या निराधार झालेल्या पाल्यांना केंद्र आणि राज्य शासनाने आर्थिक मदतीसह शैक्षणिक मदत करण्याची घोषणा केली आहे. त्यासाठी योजनाही बनविण्यात येत आहे. हे सकारात्मक पाऊल असतानाच ज्या कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा, मुलीचा कोरोनाने मृत्यू झाला, अशा मुलांच्या पालकांना मदत कोण करणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या पालकांनी कोणाच्या मदतीने उर्वरित आयुष्य घालवावे, त्यांना आर्थिक, मानसिक, आरोग्य, आदी बाबतीत कोण मदतीचा हात पुढे करणार याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
केंद्र सरकारने कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना आर्थिक मदत देण्याची घोषणा केल्यानंतर याविषयी राज्य शासनानेही मदतीची योजना जाहीर केली आहे. नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत कोरोनामुळे आई-वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या बालकांना आधार देण्यासाठी त्यांच्या नावावर एकरकमी पाच लाख रुपयांची मुदत ठेव ठेवण्याचा तसेच बालक सक्षम होईपर्यंत त्याचा खर्च बालसंगोपन योजनेतून उचलण्याचा निर्णय घेतला आहे. नातेवाईक या बालकाचे संगोपन करण्यास तयार असल्यास त्यांना महिला व बालविकास विभागाच्या बालसंगोपन योजनेतून अनुदानही देण्यात येणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय असतानाच ज्या वयोवृद्ध आई-वडिलांचा एकुलता एक कमावता मुलगा, मुलगी कोरोनाने हिरावून घेतली आहे, त्या माता-पित्यांना मदत कोण करणार याविषयी चर्चा सुरू झाल्या आहेत. राज्य शासनाने अशा पालकांविषयीही योजना जाहीर करावी, अशी मागणी पुढे येऊ लागली आहे.
पॉईंटर्स (ही आकडेवारी सोमवारची आहे, आज सायंकाळी मिळाल्यास बदल करता येईल)
कोरोनाचे एकूण रुग्ण : १,४३,९४६
बरे झालेले : १,३८,४१६
सध्या उपचार घेत असलेले : २२४६
एकूण मृत्यू : ३२८४
बॉक्स
ज्येष्ठांचे प्रश्न वेगळेच
ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न वेगळेच असतात. हे प्रश्न मुलगा किंवा मुलगी असतानाही सोडविताना संबंधितांची दमछाक होत असते. मात्र, कमावता मुलगा गेल्यामुळे बाहेरील कोणीही या ज्येष्ठांचे संगोपन करताना प्रश्न अधिक जटिल होऊन जातात. यात सामाजिक, मानसिक आरोग्य, याशिवाय विविध आजारांचा समावेश होतो. वृद्ध व्यक्तींना काही सवयी असतात. त्या सवयी या काळातील नवतरुणांना चुकीच्या वाटतात. यातूनही अनेक समस्या निर्माण होत आहेत.
बॉक्स
अशा पालकांना अर्थसाहाय्याची गरज
संरक्षण क्षेत्र वगळता कोणत्याच विभागात मुलगा गमावल्यानंतर आई-वडिलांना मदत करण्याची योजना नाही किंवा तरतूद केलेली नाही. त्यामुळे कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांप्रमाणेच कमावता एकमेव मुलगा मरण पावलेल्या आई-वडिलांनाही आर्थिक साहाय्य झाले पाहिजे. त्यांच्या देखभालीचे नियोजन केले पाहिजे, तरच अशा पालकांना आधार मिळेल. त्यांचे आगामी काळातील जगणे सुसह्य होईल, अशी आशा आहे,
- दीपक नागरगोजे, सामाजिक कार्यकर्ते