कनिष्ठ भूवैज्ञानिकांमुळे अडल्या पाणीटंचाईच्या उपाययोजना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:05 AM2021-04-02T04:05:01+5:302021-04-02T04:05:01+5:30
औरंगाबाद : कनिष्ठ भूवैज्ञानिक नसल्याने टंचाई काळात विंधन विहिरी, विहिरी अधिग्रहण, टँकर मंजुरी, तात्पुरती नळयोजनेच्या उपाययोजनांसाठी प्रपत्र ब भरून ...
औरंगाबाद : कनिष्ठ भूवैज्ञानिक नसल्याने टंचाई काळात विंधन विहिरी, विहिरी अधिग्रहण, टँकर मंजुरी, तात्पुरती नळयोजनेच्या उपाययोजनांसाठी प्रपत्र ब भरून न दिल्याने संचिका अडल्या आहेत. ही रेंगाळलेली कामे ५ एप्रिलपर्यंत मार्गी लावा, अन्यथा ६ एप्रिलला जिल्हा परिषदेत उपोषणाला बसण्याचा इशारा जिल्हा परिषद सदस्य रमेश पवार यांनी दिला आहे.
चिंचोली, तोळानाईक तांडा या गावांत पाणीटंचाईमुळे स्वखर्चाने टँकरने पाणीपुरवठा करत आहे. गेल्या चार स्थायी समितीच्या सभांतही पाणीटंचाई संबंधीच्या प्रश्नांना वाचा फोडत आहे. तरीही अद्याप त्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही. पाणीपुरवठा विभागातील कामे प्रगती शून्य आहेत. जलजीवन मिशनअंतर्गत अंदाजपत्रक दाखल करूनही या विभागातील कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणामुळे किरकोळ कारणांवरून कामे अडली आहेत. त्यामुळे नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागत असून, त्यांच्या रोषाला लोकप्रतिनिधींना सामोरे जावे लागत आहे. टंचाईच्या गावातील कामे तत्काळ मार्गी लावा, अशी मागणी पवार यांनी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ५ एप्रिलपर्यंत ही कामे मार्गी लावा, अन्यथा ६ एप्रिलला जिल्हा परिषदेत उपोषणाला बसण्याशिवाय पर्याय नसल्याचे पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.