इंग्रजी शाळांचे प्रलंबित प्रश्न मार्गी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:06 AM2021-01-13T04:06:50+5:302021-01-13T04:06:50+5:30
बेमुदत उपोषण मागे : मेसा इंग्रजी शाळा संघटनेसोबत घेतली बैठक औरंगाबाद : मेसा इंग्रजी शाळा संघटनेच्या स्थानिक पातळीवरील प्रलंबित ...
बेमुदत उपोषण मागे : मेसा इंग्रजी शाळा संघटनेसोबत घेतली बैठक
औरंगाबाद : मेसा इंग्रजी शाळा संघटनेच्या स्थानिक पातळीवरील प्रलंबित मागण्या अनेक दिवसांपासून प्रलंबित होत्या. उपोषण, आंदोलने करूनही शिक्षण विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने १४ जानेवारीपासून मेसाने बेमुदत उपोषणाचा इशारा शिक्षणाधिकारी जयस्वाल यांना दिला होता. त्यामुळे जयस्वाल यांनी मेसाच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेसाठी बोलावून, सोमवारी बैठक घेत, शनिवारपर्यंत प्रलंबित मागण्या निकाली काढू, असे आश्वासन दिले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यात आले, अशी माहिती मेसाचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे यांनी दिली.
प्रथम शाळा मान्यता, आरटीई नमुना २ प्रमाणपत्र, नैसर्गिक वर्ग वाढ पुढील दोन दिवसात देण्यात येणार असून तालुकानिहाय आरटीई प्रतिपूर्ती वाटपासाठी शिबिरातच मंजुरी देणे, निधी प्राप्त होताच सन २०१८-१९ ची प्रतिपूर्ती ५० टक्के व २०१९-२० ची १०० टक्के प्रतिपूर्ती वाटप करण्यात येईल. याशिवाय शाळा संरक्षण कायद्याबाबत शासनस्तरावरून पाठपुरावा करण्यात येत असून शाळांवर हल्ला करणारे हल्लेखोर तसेच खंडणीच्या उद्देशाने शाळांना वेठीस धरणाऱ्या खंडणीखोरांविरुध्द पोलीस आयुक्त यांच्याकडे अहवाल देण्यात आला असल्याचे सांगून, शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जयस्वाल यांनी मेसाच्या शिष्टमंडळास आश्वस्त केले.
शिष्टमंडळात मेसा संघटनेचे अध्यक्ष प्रल्हाद शिंदे, उपाध्यक्ष हनुमान भोंडवे, सरचिटणीस प्रवीण आहाळे, सुनील मगर, संजय पाटील, रत्नाकर फाळके, विश्वासराव दाभाडे, शेख झिया, कल्याणी सांगोले, पोपट खैरनार, संजय कुलकर्णी आदींचा सहभाग होता.