ऑरिकमध्ये नव्या उद्योगासह रेल्वे प्रश्न सोडवा
By | Published: November 28, 2020 04:04 AM2020-11-28T04:04:54+5:302020-11-28T04:04:54+5:30
औरंगाबाद : ऑरिकमध्ये मोठे प्रकल्प आणावेत, ज्यामुळे औरंगाबादच्या उद्योगांना नवसंजीवनी मिळेल. याचबरोबर दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे सेवेत भर ...
औरंगाबाद : ऑरिकमध्ये मोठे प्रकल्प आणावेत, ज्यामुळे औरंगाबादच्या उद्योगांना नवसंजीवनी मिळेल. याचबरोबर दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या रेल्वे सेवेत भर घालावी, अशी मागणी औरंगाबाद फर्स्टतर्फे अध्यक्ष प्रीतिश चॅटर्जी यांनी खासदार भागवत कराड यांच्यामार्फत विशेष बैठकीत रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याकडे केली.
औरंगाबाद फर्स्टने सांगितले की, औरंगाबादमध्ये पिटलाईन, मनमाड ते परभणी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि विद्युतीकरण, रेल्वे फाटकाजवळ दोन भुयारी मार्ग आणि चार उड्डाणपूल आणि औरंगाबाद सध्या दक्षिण-मध्य रेल्वे क्षेत्रात येतो तो बदलून द्यावा. पंचवटी एक्स्प्रेस आणि नांदेड ते बंगळूर एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंत आणाव्यात. ज्यामुळे औरंगाबादची कनेक्टिव्हिटी वाढण्यास मदत होईल. त्याशिवाय ऑरिक सिटीमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध असून त्यात नव्या मोठ्या उद्योगांची नितांत आवश्यकता आहे.
त्यावर बोलताना गोयल म्हणाले की, ऑरिक हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून लवकरात लवकर मोठ्या प्रकल्पांसाठी प्रयत्न केले जातील. त्याशिवाय ज्या रेल्वे औरंगाबादपर्यंत वाढविता येणे शक्य असेल, त्याचा अभ्यास करून निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर पिटलाईन आणि रेल्वे मार्ग दुहेरीकरण करण्यासाठी फ्रेटच्या प्रमाणावर अवलंबून आहे. रेल्वे फाटकाजवळ असलेले भुयारी मार्ग आणि उड्डाणपूल करण्यास केंद्र सरकार तयार आहे. मात्र, यात उड्डाणपूल तयार करण्यासाठी राज्य सरकारने ५० टक्के वाटा उचलणे आवश्यक आहे, असे मत व्यक्त केले.