तिसगाव नवीन म्हाडातील पाणी प्रश्न सोडवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2020 07:26 AM2020-11-12T07:26:02+5:302020-11-12T07:26:02+5:30

वाळूज महानगर : तिसगावच्या नवीन म्हाडा वसाहतीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहेत. या वसाहतीत दोन दिवसाआड अत्यल्प पाणी ...

Solve the water problem in Tisgaon New MHADA | तिसगाव नवीन म्हाडातील पाणी प्रश्न सोडवा

तिसगाव नवीन म्हाडातील पाणी प्रश्न सोडवा

googlenewsNext

वाळूज महानगर : तिसगावच्या नवीन म्हाडा वसाहतीतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहेत. या वसाहतीत दोन दिवसाआड अत्यल्प पाणी पुरवठा होत असल्यामुळे संतप्त नागरिकांनी सोमवार (दि.९) म्हाडा कार्यालयातील अधिकाऱ्यांना धारेवर धरत सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली.

तिसगावच्या गट क्रमांक १०४ (अ) मध्ये महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा)च्यावतीने मध्यम उत्पन्न गटातील नागरिकांसाठी घरे बांधली आहेत. या वसाहतीत वर्षभरापूर्वी मध्यम उत्पन्न गट योजनेअंतर्गत २४८ सदनिकांची सोडत काढण्यात आली होती. या सोडतीत उद्योगनगरीत वास्तव्यास असणाऱ्या अनेक कामगारांनी सदनिका खरेदी करुन या वसाहतीत वास्तव्यास आले आहे. म्हाडा प्रशासनाच्यावतीने सिडकोकडून पाणी घेऊन या नवीन वसाहतीत पाणी पुरवठा करण्यात येतो. आजघडीला या भागात दोन दिवसाआड फक्त सव्वा तास पाणी पुरवठा करण्यात येत असल्यामुळे नागरिकांना सणासुदीच्या काळात तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. गत आठवड्यातही जवळपास ५ दिवस या परिसरात सिडकोने पाणी पुरवठा न केल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला होता. पाणीपट्टी म्हाडा प्रशासनाकडे जमा करुनही सुरळीत पाणी पुरवठा होत नसल्यामुळे नागरिकात असंतोषाचे वातावरण आहेत. सिडकोकडून पाणी पुरवठ्याचे नियोजन सतत कोलमडत असल्यामुळे नागरिकांना जारचे विकत पाणी घेऊन तहान भागवावी लागत आहेत.

म्हाडाच्या नवीन वसाहतीत पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, यासाठी नागरिकांनी सतत म्हाडा प्रशासनाकडे तक्रारी केल्या आहेत. मात्र म्हाडा प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्यामुळे सोमवार (दि.९) संतप्त नागरिकांनी शहरातील म्हाडा कार्यालय गाठले. यावेळी म्हाडाचे प्रभारी कार्यकारी अभियंता एस.बी.बाहेगव्हाणकर यांना धारेवर धरत सुरळीत पाणी पुरवठा करण्याची मागणी केली. या प्रसंगी अभियंता बाहेगव्हाणकर यांनी सिडको प्रशासनाकडे पत्रव्यवहार करुन या वसाहतीत सुरळीत पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन नागरिकांना दिले. यावेळी तिसगाव आनंद दिडहाते, ज्ञानेश्वर नवनिधे, मनीष होले, मानसिंग डोणगावकर, गोविंद बोर्डे, आगलावे, कुलकर्णी, लोखंडे आदी सदनिकाधारकांची उपस्थिती होती.

--------------------------------

Web Title: Solve the water problem in Tisgaon New MHADA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.