'काहीजण चुकीचं विधानं करत आहेत, सर्वांनी शांतता पाळावी'; ठाकरे गटाच्या नेत्यावरुन देवेंद्र फडणवीसांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 12:53 PM2023-03-30T12:53:31+5:302023-03-30T12:55:27+5:30
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, शातंता राखण्याचे आवाहन चुकीची विधानं न करण्याचे आवाहन केलं आहे.
काल रात्री छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरातील राम मंदिराजवळ परिसरात काही समाज कंटकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन गटात दगडफेक झाली. यावेळी पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आल्या. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देत, शातंता राखण्याचे आवाहन चुकीची विधानं न करण्याचे आवाहन केलं आहे.
काल मध्यरात्री अचानक सुरू झालेल्या गोंधळामुळे पोलीस यंत्रणेवर ताण आला. या गोंधळात पोलिसांच्या गाड्याही जाळण्यात आली आहेत. पोलिसांनी तातडीने परिस्थिती हाताळली. पहाटे पाच वाजेपर्यंत पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणली. या घटनेनंतर आज राजकीय वर्तुळातून आरोप- प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी सरकारवर आरोप केले. यावरुन आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटांत वादानंतर शांतता; दगडफेक, पोलिसांच्या गाड्याही जाळल्या
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, संभाजीनगरमध्ये घडलेली घटना ही दुर्देवी आहे, आता तिथे शांतता प्रस्थापीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. काही नेत्यांकडून भडकवणारे स्टेटमेंट देण्याचे काम सुरू आहे. अशा परिस्थीतीत नेत्यांनी कसे वागले पाहिजे हे समजले पाहिजे, सर्वांनी शांतता पाळावी, ही सर्व नेत्यांची जबाबदारी आहे, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले. आता पोलीस गुन्हा दाखल करुन आरोपींना ताब्यात घेत आहेत, असंही फडणवीस म्हणाले.
पालकमंत्री भुमरे यांनी केले आवाहन
काल झालेल्या वादातून त्याठिकाणी दहा ते बारा गाड्यांची जाळपोळ करण्यात आली, या ठिकाणी भुमरे यांनी भेट देत पाहणी केली. कोणी दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे यावेळी भुमरे यांनी सांगितले. पोलिसांनी परिस्थिती आटोक्यात आणलेली आहे तरी जनतेने शांतता ठेवावी आणि रामनवमी पार पाडावी. कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये. जे कोणी आरोपी असतील त्यांच्यावर कारवाई होईलच परंतु आज आपण सर्वांनी शांतता पाळून शांततेत सणउत्सव पार पाडावेत, असंही पालकमंत्री भुमरे म्हणाले.