काहींना परीक्षेविना सेवासातत्य
By Admin | Published: May 31, 2016 12:05 AM2016-05-31T00:05:57+5:302016-05-31T00:11:02+5:30
लातूर : बंधपत्रातील नियुक्तीनुसार आरोग्यसेवेत वर्षानुवर्षे अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या काही अधिपरिचारिकांना आरोग्य विभागाकडून सेवासातत्य देण्यात आले आहे़
लातूर : बंधपत्रातील नियुक्तीनुसार आरोग्यसेवेत वर्षानुवर्षे अधिपरिचारिका म्हणून कार्यरत असलेल्या काही अधिपरिचारिकांना आरोग्य विभागाकडून सेवासातत्य देण्यात आले आहे़ मात्र काहींना सेवासातत्य आदेश दिले नाहीत़ आता १९ जून रोजी ज्यांना सेवासातत्य आदेश नाहीत, त्यांची परीक्षा घेतली जाणार आहे़ यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिपरिचारिकांत तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे़
बंधपत्राद्वारे सार्वजनिक आरोग्य विभागात अनेक कर्मचारी अधिपरिचारिका म्हणून सेवेत आल्या़ बंधपत्राची मुदत संपल्यानंतरही त्या सेवेत राहिल्या़ स्थायी कर्मचाऱ्यांना जे लाभ देण्यात येतात ते सर्व लाभ या अधिपरिचारिकांना देण्यात आले़ वेतनवाढ, अर्जीत रजा, पदोन्नती असे सर्व लाभ देण्यात आले़ परंतु, सेवासातत्याचे आदेश दिले नाही़ आरोग्य प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांच्या बंधपत्राकडे दुर्लक्ष केले़ त्यामुळे सेवासातत्य मिळाले नाही़ परंतु, बंधपत्रातील काही कर्मचाऱ्यांना परीक्षेविना सेवासातत्याचे आदेश दिले आहेत़ ३१ मे २००२ रोजी लातूर परिमंडळातील २२ अधिपरिचारिकांना आरोग्य उपसंचालकांकडून सेवासातत्याचे आदेश मिळाले आहेत़ मग या कर्मचाऱ्यांना कसे परीक्षाविना सेवासातत्याचे आदेश दिले, असा प्रश्न अधिपरिचारिकांकडून उपस्थित केला जात आहे़ सेवासातत्याचे आदेश दिलेल्या या २२ अधिपरिचारिकांची १८ महिन्यांची बंधपत्राची मुदत २००० व २००१ साली संपलेली होती़ जसे या कर्मचाऱ्यांच्या बंधपत्राच्या मुदतीकडे प्रशासनाचे लक्ष गेले तसे आमच्या बंधपत्राच्या बाबतीत का गेले नाही, असाही सवाल अधिपरिचारिकांनी केला आहे़ बंधपत्राची मुदत संपल्यानंतर ज्यांची सेवा अखंडपणे झाली आहे़ त्यांना परीक्षाविना सेवासातत्य देण्यात यावे, अशी मागणी अधिपरिचारिकांकडून केली जात आहे़ (प्रतिनिधी)