'काहींनी ते कपडे जाळूनही टाकले'; रोहित पवारांचा शिंदेंच्या आमदारांवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 12:56 PM2023-08-17T12:56:08+5:302023-08-17T12:57:13+5:30
छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांच्या छ. संभाजीनगर येथील कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली.
छ. संभाजीनगर - राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार शिंदे गटातील आमदारांसाठी गेल्या वर्षभरापासून रखडलेला आहे. विशेष म्हणजे पावसाळी अधिवेशनाच्या दोन दिवस अगोदर हा विस्तार होणारच असे म्हणत शिंदे गटाचे नेते आणि आमदार संजय शरसाट व भरत गोगावले यांनी खात्रीदेखील दिली होती. मात्र, मंत्रिमंडळ विस्तार पुन्हा रेंगाळला. आता, अधिवेशन होऊनही दोन आठवडे झाले असून अद्यापही विस्ताराची कुठलीही चर्चा नाही. त्यातच, भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्रिपद न मिळाल्याची पुन्हा एकदा नाराजी जाहीर केली. त्यासंदर्भात आमदार रोहित पवार यांना विचारलं असता, आता आमदारांनी आशाच सोडून दिल्याचं म्हटलं.
छत्रपती संभाजीनगरमध्ये विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे साहेब यांच्या छ. संभाजीनगर येथील कार्यालयाला त्यांनी सदिच्छा भेट दिली. त्यावेळी, माध्यम प्रतिनीधींच्या प्रश्नावर उत्तर देताना रोहित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तार आणि शिंदे गटातील आमदारांवर भाष्य केलं.
ज्या जिल्ह्यामध्ये, शहरामध्ये आपण बसलोय तिथेही एकजण इच्छुक आहेच ना, असे म्हणत नाव न घेता आमदार रोहित पवार यांनी संजय शिरसाट यांना टोला लगावला. तसेच, अनेक आमदारांनी कपडे शिवले होते, कोणाचं वजन वाढलं म्हणून ते बसेनात. तर, काहींना जाळूनही टाकले असं आम्हाला समजलं. कारण, गेल्या महिन्याच्या २ तारखेनंतर सगळ्यांना कळलंय की, आता नवीन मंत्रीपदं मिळणार नाहीत, असे म्हणत आमदार पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तावर भाष्य केलं. तसेच, शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांच्यासह शिंदे गटातील आमदारांवर निशाणाही साधला.
काय म्हणाले भरत गोगावले
छत्रपती शिवाजी महाराजांनी मावळ्यांच्या साथीने स्वराज्याची स्थापना केली. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे हे आमच्या जिवावर मुख्यमंत्री झाले आहेत, असे विधान शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी येथे केले. एकाने पत्नी आत्महत्या करेल, दुसऱ्याने राजीनामा देतो, तर तिसऱ्याने नारायण राणे संपवतील, अशी गळ तीन आमदारांनी मुख्यमंत्र्यांना घातली. त्यामुळे पेचात पडलेल्या मुख्यमंत्र्यांना संबंधित आमदारांना मंत्रिपद द्या असे सांगून मी आजपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहिल्याची खंत आमदार भरत गोगावले यांनी बोलून दाखवली. अलिबाग तालुक्यातील खानाव येथील काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनंत गोंधळी यांनी बुधवारी आमदार गोगावले, आमदार महेंद्र दळवी यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी बोलताना आमदार गोगावले यांनी आपली खंत व्यक्त केली.