काहींनी नोकरी, करिअरमुळे तर काहींनी गर्भात दोष असल्याने केला गर्भपात, वर्षभरात ४९० केस
By संतोष हिरेमठ | Published: January 25, 2024 05:38 PM2024-01-25T17:38:31+5:302024-01-25T17:39:10+5:30
गर्भपातांच्या संख्येत किंचित घट : कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात
छत्रपती संभाजीनगर : नोकरी करायची आहे, करिअर घडवायचे आहे. पहिले बाळ अजून लहान आहे, आता लगेच दुसरे बाळ नको, यासह अनेक कारणांनी नको असलेला गर्भ काढून टाकला जातो. एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या वर्षभरात ४९० गर्भपात झाले.
गर्भपात म्हटले की, अगदी हळू आवाजात बोलले जाते. मुलगी नको म्हणून गर्भपात केल्याच्या संशयित नजरेनेही पाहिले जाते. मात्र, गर्भपात हा स्त्रीचा हक्क आहे, हे अनेकांना माहीतच नाही. कायदेशीर आणि वैद्यकीय सल्ल्याने गर्भपात केले जातात. एकट्या घाटीत महिन्याला ४० ते ४५ गर्भपात होतात.
कायदेशीर गर्भपाताची कारणे काय?
गर्भनिरोधक उपाय करूनही गर्भ राहिलेला असेल, तसेच इतर काही कारणांमुळे वैद्यकीय सल्ल्याने आणि कायदेशीररीत्या गर्भपात करता येतो. गरोदरपणात सोनोग्राफी केल्यानंतर गर्भात व्यंग असल्याचे निदान झाल्यानंतरही वैद्यकीय सल्ल्यानुसार गर्भपात केले जातात. २०२२च्या तुलनेत झाली घट घाटीत २०२२ मध्ये ५२७ गर्भपात झाले होते. या तुलनेत २०२३ मध्ये गर्भपाताचे प्रमाण कमी राहिले. तर २०२१ मध्ये ४०७ गर्भपात झाले होते.
किती आठवड्यांपर्यंत करता येतो गर्भपात
गरोदरपणाच्या २४ आठवड्यांपर्यंत गर्भपात करता येतो. गरोदरपणाच्या २० ते २४ आठवड्यांदरम्यान गर्भात काही व्यंगांचे निदान झाले तर गर्भपातासाठी पूर्वी न्यायालयात जावे लागत असे. पण, आता डाॅक्टरच गर्भपाताची परवानगी देऊ शकतात.
दोष, व्यंग असल्याने सर्वाधिक गर्भपात
वैद्यकीय सल्ल्यानुसार आणि कायदेशीर बाबी पाळून गर्भपात करण्यात येतात. गर्भातील बाळात दोष, व्यंग असल्याने गर्भपाताचे प्रमाण सर्वाधिक आहे. गेल्या वर्षभरात घाटी रुग्णालयात ४९० गर्भपात झाले. यात २० ते २४ आठवड्यांतील ८१ गर्भपात झाले.
- डाॅ. श्रीनिवास गडप्पा, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभागाप्रमुख, घाटी