चिल्लर घेईना कुणी,बँकेत करोडोंच्या नाण्यांचा ढीग;अफवा,डिजिटल पेमेंटने बँकांसमोर यक्षप्रश्न
By प्रशांत तेलवाडकर | Published: November 12, 2022 05:23 PM2022-11-12T17:23:03+5:302022-11-12T17:23:30+5:30
औरंगाबादमधील चित्र : नाणी बंद झाल्याची अफवा अन् डिजिटल पेमेंटचा परिणाम
औरंगाबाद : एकीकडे बँकाना रिझर्व्ह बँकेकडून नाण्यांचा पुरवठा केला जात असून, दुसरीकडे बाजारात १० रुपयांची नाणी बंद झाल्याची अफवा, खिशात नाणी बाळगणे जड वाटते आणि छोट्या व्यवहारातही डिजिटल पेमेंटचा (यूपीआय) वाढता वापर यांमुळे बाजारात चिल्लर नाण्यांचा व्यवहार कमी होत आहे. परिणामी, औरंगाबादेतील बँकांच्या करन्सी चेस्टमध्ये तब्बल ९ कोटी रुपये मूल्यांची नाणी साठली आहे. बँकांमध्ये आता नाण्यांचा हा साठा ठेवण्यासाठी जागाच नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
औरंगाबाद शहरात १० रुपयांची नाणी व्यवहारात आहेत, पण जिल्ह्यात ग्रामीण भागात ही नाणी व्यवहारात दिसत नाही. तालुक्यातील बँकांच्या शाखांतून शहरातील करन्सी चेस्टमध्ये नाणी पाठविली जात आहेत. एवढेच नव्हे, तर परभणी, बीड, नांदेड या शहरांतून औरंगाबादेत येणारे नागरिक सोबत नाणी घेऊन येत आहेत. तेथे १० रुपयांची नाणी व्यापारी घेत नाहीत. त्यामुळे तेथील नागरिक औरंगाबादेत येऊन नाण्यांचा वापर करीत आहेत.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या दोन करन्सी चेस्ट आहेत. बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया व एचडीएफसी या बँकांच्या करन्सी चेस्ट आहेत. या बँकांच्या मिळून ९ कोटींची नाणी धूळखात पडून आहे. ग्राहक नाणी घेण्यास तयार नाहीत. त्यात ६० टक्के नाणी ही १० रुपयांची आहेत. काही किरकोळ विक्रेतेच नाणी घेतात. या ९ कोटींच्या नाण्यांचे करायचे काय, असा यक्षप्रश्न बँकांसमोर आहे. कारण, रिझर्व्ह बँक नाणी परत घेण्यास तयार नाही. नाणी व्यवहारातच चालवा, असे आदेश आहेत.
२० रुपयांच्या नाण्यांची भर
आधची १ रुपया, २ रुपये, ५ रुपये व १० रुपयांची नाणी बँकांमध्ये धूळखात पडून असताना रिझर्व्ह बँकेने २० रुपयांच्या नाणी मोठ्या प्रमाणात बँकांमध्ये पाठविली आहेत.
दैनंदिन व्यवहारात नाण्यांचा वापर वाढवा
रिझर्व्ह बँकेने वेळोवेळी जाहीर केले आहे की, कोणतेही नाणी व्यवहारातून बाद केली नाहीत. बँकांना नाणी आणून देण्यापेक्षा ती दैनंदिन व्यवहारात उपयोगात आणा. ज्यांना नाणी लागतात त्यांनी बँकांमध्ये मागणी करावी.
- शिवानी वर्मा, मुख्य व्यवस्थापक, एसबीआय, क्रांतिचौक करन्सी चेस्ट
१० रुपयांच्या नोटांचा तुटवडा
सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या करन्सी चेस्टमध्ये ५० लाखांची नाणी पडून आहेत. त्यात ३५ लाखांच्या १० रुपयांनी नाण्यांचा समावेश आहे. ग्राहक १० रुपयांनी नाणी घेत नाही, दुसरीकडे १० रुपयांच्या नोटांचा तुटवडा आहे. नाणी घेऊन जा, असा आग्रह आम्ही ग्राहकांना करतो.
- हेमंत जामखेडकर, महासचिव, सीबीआयईए