अभियांत्रिकी परीक्षेसाठी पुन्हा ‘होम सेंटर’ सुरु करण्याचा काहींचा डाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 04:38 PM2018-04-27T16:38:48+5:302018-04-27T16:41:08+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बदनाम करणाऱ्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणापासून धडा घेत ‘होम सेंटर’ बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला बदनाम करणाऱ्या साई अभियांत्रिकी महाविद्यालयात घडलेल्या प्रकरणापासून धडा घेत ‘होम सेंटर’ बंद करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला होता. मात्र, परीक्षेत कॉपी पकडलेल्या विद्यार्थ्यांकडून आत्महत्येची धमकी देण्यात येत आहे. यावर उपाय म्हणून पुन्हा महाविद्यालयांना ‘होम सेंटर’ बहाल करण्याची मागणी काही प्राचार्य विद्यापीठ प्रशासनाकडे करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
एमआयटी नर्सिंग महाविद्यालयात कॉपी पकडल्यामुळे विद्यार्थ्याने इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली. यानंतर डॉ. रफिक झकेरिया महिला महाविद्यालय, विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालयात कॉपी पकडलेल्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यासाठी उडी घेण्याची नौटंकी केली. यावर प्राचार्य, प्राध्यापकांच्या संघटनांनी जर काही वाईट घटना घडल्यास संबंधित महाविद्यालयातील पर्यवेक्षक, प्राचार्यवर गुन्हे दाखल होऊ नयेत, याविषयी ठोस पावले उचलण्याची मागणी पोलीस, विद्यापीठ प्रशासनाकडे केली आहे. मात्र, या घटनांचे भांडवल करून आपल्याच महाविद्यालयात परीक्षा घेण्याची (होम सेंटर) मुभा देण्याची मागणी काही प्राचार्य करण्याच्या तयारीत आहेत.
याविषयी मोहीमही राबविण्यात येत आहे. यासाठी होम सेंटर असल्यास संबंधित महाविद्यालय प्रशासनाला विद्यार्थ्यांची माहिती, ओळख असते, असाही दावा केला जात आहे. मात्र, दुर्घटना घडलेल्या एमआयटी नर्सिंग महाविद्यालयातही नाशिकच्या आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे घेण्यात येत असलेल्या परीक्षा होम सेंटरवरच घेण्यात येत होत्या. त्याकडे संबंधित प्राचार्य सोईस्करपणे दुर्लक्ष करीत आहेत. होम सेंटर नसल्यामुळे दुसऱ्या ठिकाणी परीक्षा देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांची संबंधित महाविद्यालयातील प्रशासनाशी ओळख नसते.
यामुळे कॉपीसारख्या प्रकाराला यावर्षीच्या परीक्षेत मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे. यामुळे पुढील वर्षी कागदोपत्री असलेल्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी संख्या घटण्याची शक्यता आहे. यामुळे धाबे दणाणलेल्या कागदोपत्रीच्या संस्थाचालकांनी आत्महत्येचा प्रयत्न करीत असलेल्या विद्यार्थ्यांच्या आडून ‘होम सेंटर’ पुन्हा मिळविण्याचा डाव आखला आहे. हा डाव यशस्वी करण्यासाठी प्राचार्यांमार्फत प्रयत्न सुरू असल्याचे एका प्राध्यापकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
महाविद्यालयात तासिका होत नसल्यामुळे कॉप्यांचा सुळसुळाट
अनेक महाविद्यालयांमध्ये तासिका होत नाहीत. शिकविण्यासाठी प्राध्यापक नाहीत. यामुळे परीक्षेत विद्यार्थी कॉपी करतात. तासिका होण्याकडे आणि विद्यार्थ्यांनी वर्गात हजर राहिले पाहिजे, याकडे प्राचार्यांनी लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करून प्राचार्य कॉप्यांचा सुळसुळाट चालणाऱ्या ‘होम सेंटर’ची मागणी रेटत आहेत. यामुळे त्यांच्या हेतूविषयी शंका उपस्थित होत आहे.
अभियांत्रिकीच्या प्राचार्यांची धडपड
होम सेंटर पुन्हा सुरू झाले पाहिजेत, यासाठी अभियांत्रिकीच्या प्राचार्यांचीच धडपड सुरू असल्याचे समजते. परीक्षेसंदर्भात नियम कडक करण्यात यावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.मात्र कोणत्याही प्रकारे होम सेंटरला अनुमोदन नसल्याचे मिलिंद कला महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली प्रधान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. होम सेंटर दिल्यास कॉपीचे गैरप्रकार मोठ्या प्रमाणात वाढण्याचा धोका असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.