शहरात कधी जोरदार, तर कधी रिमझिम पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:03 AM2021-09-13T04:03:22+5:302021-09-13T04:03:22+5:30
औरंगाबाद : शहरात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. कधी जोरदार, तर कधी रिमझिम पाऊस बरसला. सायंकाळी ...
औरंगाबाद : शहरात सलग दुसऱ्या दिवशी रविवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. कधी जोरदार, तर कधी रिमझिम पाऊस बरसला. सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत चिकलठाणा वेधशाळेत १९.४ मिमी, तर एमजीएम वेधशाळेत १३.२ मिमी पावसाची नोंद झाली.
शहरात दुपारी १ वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. घाटी, मिलकाॅर्नर, रेल्वे स्टेशन, गारखेडा, सिडको, हडको परिसरात जवळपास १५ मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली. काही मिनिटांच्या हजेरीने ज्युबली पार्क, रेल्वेस्टेशन परिसरासह अनेक रस्त्यांवर पाणीच पाणी साचले. उल्कानगरी परिसरातील चेतक घोडा चौकाला पाण्याने वेढा घातला होता. या रस्त्यावरून ये-जा करताना वाहन चालकांना कसरत करावी लागली.
सिडको-हडको परिसराच्या तुलनेत चिकलठाणा परिसरात पावसाचा जोर अधिक होता. त्यामुळे या भागात पावसाची अधिक नोंद झाली. चिकलठाणा वेधशाळेत दुपारी २.३० वाजेपर्यंत १६.२ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतरही थोड्या-थोड्या वेळाने विश्रांती घेत, सायंकाळपर्यंत पावसाने हजेरी लावली. दुपारनंतर सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत ३.२ मिमी पावसाची भर पडली आणि चिकलठाणा वेधशाळेत १९.४ मिमी पावसाची नोंद झाली.
शहराबाहेर ५.१ मिमी पाऊस
एमजीएम गांधेली वेधशाळेत सायंकाळपर्यंत ५.१ मिमी पावसाची नोंद झाल्याची माहिती हवामान तज्ज्ञ श्रीनिवास औंधकर यांनी दिली. पावसाच्या हजेरीने वातावरण अल्हाददायक झाले. शहर परिसरातील डोंगर ढगांमध्ये हरविले होते.