सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला; शरीरावर अनेक जखमा...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 17:04 IST2024-12-16T16:59:15+5:302024-12-16T17:04:18+5:30
प्राथमिक शवविच्छेदन अहवाल : घाटीत ३ तास चालले ‘इन कॅमेरा’ पोस्टमार्टम

सोमनाथ सूर्यवंशीच्या शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल आला; शरीरावर अनेक जखमा...
छत्रपती संभाजीनगर : अनेक जखमांमुळे सोमनाथ सूर्यवंशी हे शाॅकमध्ये गेल्याने मृत्यू झाल्याचे प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून समोर आले. छत्रपती संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) शवविच्छेदनगृहात ३ तास ‘इन कॅमेरा’ पोस्टमार्टेम करण्यात आले.
घाटीत सकाळी ८ वाजता शवविच्छेदनाला सुरुवात झाली. ६ डाॅक्टरांच्या पथकाने ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन केले. नियमित शवविच्छेदनाला एक ते दीड तास लागतो. मात्र, हे शवविच्छेदन ३ तास चालले. सकाळी ११ वाजता शवविच्छेदन पूर्ण झाले. त्यानंतर शवविच्छेदनाचा प्राथमिक अहवाल समोर आला.
काय आहे अहवालात? तज्ज्ञ काय म्हणाले?
शवविच्छेदनाच्या अहवालात मृत्यूच्या तत्काळ कारणाच्या चौकटीत 'शॉक फॉलोइंग मल्टिपल इंज्युरी' असे नमूद करण्यात आले आहे. याचा नेमका काय अर्थ आहे, हे जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’ने तज्ज्ञांशी संपर्क साधला. तेव्हा अनेक जखमांमुळे रुग्ण ‘शाॅक’मध्ये गेल्याने मृत्यू झाल्याचे अहवालात नमूद केले आहे, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.
विश्लेषणासाठी व्हिसेरा राखीव
रूटीन व्हिसेरा रासायनिक विश्लेषणासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. रक्ताने भिजलेले कापूस, अवयवांचे तुकडे हिस्टोपॅथोलाॅजिकल तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम अभिप्राय (ओपिनिअन) दिला जाईल, असे शवविच्छेदन अहवालात नमूद करण्यात आले आहे.
शवविच्छेदनापूर्वी सीटी स्कॅन का?
शवविच्छेदनापूर्वी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पार्थिवाची सीटी स्कॅन तपासणी करण्यात आली. एखाद्या मृतदेहाचे सीटी स्कॅन का केले जाते, याविषयी तज्ज्ञांना विचारले. तेव्हा शरीरावरील बारीक जखमाही सीटी स्कॅनमुळे दिसण्यास मदत होत असल्याचे सांगण्यात आले.
लातूर की परभणी; पोलिसांनी पार्थिवाचे वाहन थांबवले
दरम्यान, सोमनाथ सूर्यवंशी याचे पार्थिव अंत्यसंस्कारासाठी छत्रपतीसंभाजीनगर येथून सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास मोठ्या पोलिस बंदोबस्तात रवाना करण्यात आले. अंबड चौफुली जवळ अंत्यसंस्कार लातूर येथे करण्यास परवानगी आहे, असे म्हणत वाहने पोलिसांनी थांबली. मात्र, नातेवाइकांनी परभणी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असे सांगत त्यावर ठाम राहिले. त्यामुळे पार्थिवदेह परभणीच्या दिशेने रवाना करण्यात आले. परभणी येथे अंत्यसंस्कारासाठी हजारो आंबेडकरी अनुयायी, चळवळीतील नेते उपस्थित आहेत.
Somnath Suryawanshi’s postmortem report.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) December 16, 2024
IMMEDIATE CAUSE WHICH CAUSED DEATH — 𝐒𝐇𝐎𝐂𝐊 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖𝐈𝐍𝐆 𝐌𝐔𝐋𝐓𝐈𝐏𝐋𝐄 𝐈𝐍𝐉𝐔𝐑𝐈𝐄𝐒. pic.twitter.com/9jTgxuk0Qz
तरुणाच्या मृत्यूनंतर परभणीत तणावपूर्ण शांतता
परभणी शहरात संविधान अवमान घटनेनंतर ११ डिसेंबर रोजी बंददरम्यान तोडफोड आणि नुकसानीच्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याची कारागृहात रवानगी केली होती. रविवारी सकाळी त्याला जिल्हा रुग्णालयात आणले असता, त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. ही माहिती समोर येताच शहरात रविवारपासून पुन्हा तणाव निर्माण झाल्याने बंदोबस्त वाढविण्यात आला. बाजारपेठेत असो की, शहरातील सार्वजनिक ठिकाणांवर प्रमुख वर्दळीच्या मार्गांवर सर्वत्र दुकाने बंद असल्याचे दिसून आले.
काय आहे प्रकरण
परभणीत १० डिसेंबर रोजी एका माथेफिरूने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील शिल्प फोडले होते. त्याच्या निषेधार्थ ११ डिसेंबरला परभणी जिल्हा बंद पुकारला होता. या बंदला हिंसक वळण मिळाले. बाजारपेठेतील बंद दुकानांसह त्यांच्या फलकांची तोडफोड झाली. अनेकांची वाहने जाळली, फोडली गेली होती. यात नासधूस करणाऱ्या अनेकांची पोलिसांनी धरपकड केली. गुन्हे नोंदवून त्यांना न्यायालयासमोर हजर केले. यातीलच एक आरोपी असलेल्या सोमनाथ व्यंकट सूर्यवंशी (३६, रा. भोसरी, जि. पुणे, ह. मु. शंकरनगर, परभणी) याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती. रविवारी त्याचा मृत्यू झाला. सूर्यवंशी याच्या मृत्यूचे कारण समजताच आंबेडकरी अनुयायी आक्रमक झाले होते. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण होते. या मृत्यू प्रकरणात छत्रपती संभाजीनगर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘इनकॅमेरा’ शवविच्छेदन पूर्ण व्हावे, यासाठी आंबेडकरी चळवळीतील नेत्यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची भेट घेत निवेदन दिले. त्यानंतर दुपारी तीन ते चारच्या दरम्यान मृतदेह छत्रपती संभाजीनगरकडे परभणीतून रवाना करण्यात आला.