'सून-मुलगा त्रास देतात';‘एल्डर लाईन’ हेल्पलाईन अचानक बंद, ज्येष्ठांना तक्रारीसाठी जागाच नाही
By स. सो. खंडाळकर | Published: August 1, 2023 11:45 AM2023-08-01T11:45:46+5:302023-08-01T11:46:37+5:30
तक्रारी ऐकून घेतल्या जातात, पण तक्रारींचा निपटारा करण्याचे प्रयत्न थांबले आहेत.
छत्रपती संभाजीनगर : घरगुती समस्यांसह ज्येष्ठांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यांना मदत मिळावी यासाठी केंद्र शासनाच्या मदतीने ‘एल्डर लाईन’ ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली, पण १ जुलै २०२३ पासून या एल्डर लाईनचे काम अचानकपणे बंद झाले आहे. याची गरज नाही, असे सांगून फिल्डवरचे काम थांबवण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
ज्येष्ठांसाठी १४५६७ हेल्पलाईन
१ ऑक्टोबर २०२१ पासून ज्येष्ठांसाठी ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सध्या हा नंबर सुरू आहे. तक्रारी ऐकून घेतल्या जातात, पण तक्रारींचा निपटारा करण्याचे प्रयत्न थांबले आहेत.
माहिती, मार्गदर्शन आणि भावनिक आधार
सून छळते, मुलगा टोमणे मारतो; पोटभर खायलाही देत नाहीत, या तक्रारी आता वाढल्या आहेत. अशावेळी या हेल्पलाईनकडून मदत व्हायची. माहिती दिली जायची, मार्गदर्शनही मिळायचे व भावनिक आधारही दिला जायचा.
सहा महिन्यांत १८० तक्रारी
दररोज एक तरी तक्रार १४५६७ या हेल्पलाईनवर हमखास यायची. या हिशेबाने सहा महिन्यांत १८० तक्रारी आल्या.
बहुतेक तक्रारींचा निपटारा
या हेल्पलाईनवर आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्याकडे कल असल्याने बहुतांश तक्रारींचा निपटारा होत असे. यात पोलिसांचीही मदत घेतली जायची. रेस्क्यू करणे, वृद्धाश्रमात नेणे ही कामे होत होती. तक्रारीनंतर घरातल्या घरात अशी प्रकरणे मिटून जात होती.
जिल्हा क्षेत्रीय अधिकारीही हतबल
सध्या तरी फिल्डवरची कामे थांबवण्यात आली आहेत. ती सुरू व्हायला किती वेळ लागेल, सांगता येत नाही. वस्तुत: ज्येष्ठ नागरिकांसमोरच्या समस्या वाढत असताना या हेल्पलाईनची नितांत गरज होती. ती अचानक बंद झाल्याने आम्ही हतबल झालो आहोत.
- स्वप्निल बारहाते, क्षेत्रीय अधिकारी, छत्रपती संभाजीनगर.