मुलगा, सून सांभाळत नाही; ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात, १४५६७ नंबरवर करा कॉल

By विजय सरवदे | Published: June 26, 2024 07:49 PM2024-06-26T19:49:11+5:302024-06-26T19:50:07+5:30

कोणत्याही मदतीसाठी करता येतो कॉल

Son, daughter-in-law not caring, helping hand for senior citizens; Call on 14567 | मुलगा, सून सांभाळत नाही; ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात, १४५६७ नंबरवर करा कॉल

मुलगा, सून सांभाळत नाही; ज्येष्ठ नागरिकांसाठी मदतीचा हात, १४५६७ नंबरवर करा कॉल

छत्रपती संभाजीनगर : ज्येष्ठ नागरिक हा समाजाचा एक महत्त्वपूर्ण घटक आहे. पण, अलीकडे म्हातारे आईवडील मुलांना ओझे वाटू लागले असून, मुलगा-सून सांभाळत नाहीत. त्यामुळे उतारवयात त्यांनी कोणाकडे दाद मागावी, असा प्रश्न निर्माण झाल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राज्य आणि केंद्र सरकारमार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. तसेच, ज्येष्ठांच्या मदतीसाठी १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुद्धा चालविली जाते.

हाडाची काडे करून ज्या आईवडिलांनी मुलांना शिकवले, नोकरीला लावले. काहीजणांना उद्योग-व्यवसायासाठीही मदत केली. पण, तीच मुले मोठी झाल्यानंतर आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांना घरातून हाकलून देत असल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. शहर व ग्रामीण परिसरात अनेक ज्येष्ठ नागरिकांना घरगुती समस्यांचा सामना करावा लागत आहे. अशा संकटसमयी त्यांना मदतीची गरज असते. पण, कोणीही त्यांना मदतीचा हात देण्यासाठी धजावत नाही. दुसरीकडे स्वत:च्या मुलांविषयी तक्रार करण्यासह अनेक ज्येष्ठ नागरिक धजावत नसून आपल्यावर होत असलेला अन्याय सहन करतात. पण, काहीजण मात्र आपल्या होत असलेल्या अन्यायाची तक्रार करण्यासाठी पुढे येत आहेत.

मदतीसाठी १४५६७ हेल्पलाईन
ज्येष्ठ नागरिकांना सहाय्य करण्यासाठी राष्ट्रीय सामाजिक संस्था, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाउंडेशनने १४५६७ या क्रमांकाची हेल्पलाइन सुरू केली आहे.

सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत करा कॉल
पीडित ज्येष्ठ नागरिकांच्या मदतीसाठी सुरू करण्यात आलेल्या १४५६७ या क्रमांकाच्या हेल्पलाईनवर सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत कॉल करता येईल. त्यांना तत्काळ मदत मिळेल. यासाठी सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग आणि जनसेवा फाउंडेशनची सेवा तत्पर आहे.

कोणत्याही मदतीसाठी करता येतो कॉल
या हेल्पलाईनवर कुटुंबाकडून होत असलेला छळाची तक्रार, संपत्तीचा वाद, वृद्धाश्रम, कायदेविषयक सल्ला यांसह विविध समस्यांसाठी ज्येष्ठ नागरिक या हेल्पलाइनवर कॉल करून मदतीची अपेक्षा करू शकतात.

Web Title: Son, daughter-in-law not caring, helping hand for senior citizens; Call on 14567

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.