कोट्यावधीचा घोटाळा करणारे यशस्विनी पतसंस्थेच्या देविदास अधानेचा मुलगा, सुनेला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 07:27 PM2024-11-12T19:27:23+5:302024-11-12T19:27:40+5:30

वर्षभर मुंबईत राहून कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या पती-पत्नीचा अटकपूर्व जामिनासाठी खटाटोप थांबला

Son, daughter-in-law of Devidas Adhane of Yashaswini Credit Bank arrested in multi-crore scam | कोट्यावधीचा घोटाळा करणारे यशस्विनी पतसंस्थेच्या देविदास अधानेचा मुलगा, सुनेला अटक

कोट्यावधीचा घोटाळा करणारे यशस्विनी पतसंस्थेच्या देविदास अधानेचा मुलगा, सुनेला अटक

छत्रपती संभाजीनगर : कोट्यवधींचा घोटाळा करून दिल्लीपर्यंत अटकपूर्व जामिनासाठी खटाटोप करणारा यशस्विनी सहकारी पतसंस्थेचा संचालक पुत्र पवन देविदास अधाने (२६) व सून श्वेता पवन अधाने (२३, दोघेही रा. नवजीवन कॉलनी) यांना अखेर सोमवारी १३ महिन्यांनंतर आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली. न्यायालयाने त्यांना १५ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याचे निरीक्षक संभाजी पवार यांनी सांगितले.

अंबादास मानकापेच्या आदर्शच्या २०२ कोटींच्या घोटाळ्यात त्याचा मुख्य व्यवस्थापक देविदासलाही अटक झाली. त्यानंतर त्याचा यशस्विनी सहकारी पतसंस्थेतील कोट्यवधींचा घोटाळाही निष्पन्न झाला. देविदास, त्याची पत्नी सविता कारागृ़हात असतानाच त्याचा मुलगा पवन व सुनेने धूम ठोकली. त्याने पोलिसांना गुंगारा देत नोंदणी विभागात जाऊन जमिनी विकण्याचाही प्रयत्न केला होता. गेल्या वर्षभरापासून पवन, त्याची पत्नी श्वेता मुुंबईतून अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्नात होते. रविवारी ते पडेगावमध्ये येणार असल्याचे कळताच उपनिरीक्षक चंद्रकांत कामठे, अंमलदार सखाराम मोरे, प्रभाकर राऊत, संदीप जाधव, वर्षा शिरसाठ यांनी त्यांना अटक केली.

असा आहे घटनाक्रम
- १२ जुलै २०२३ रोजी अंबादासच्या २०२ कोटींच्या घोटाळ्याचा गुन्हा दाखल.
- ७ ऑक्टोबर २०२३ रोजी देविदासच्या यशस्विनीत ४७ कोटींच्या घोटाळ्याचा स्वतंत्र गुन्हा दाखल.
- ११ ऑक्टोबर २०२३ रोजी आदर्श प्रकरणात देविदास, सविताला अटक.
- २ नोव्हेंबर २०२३ रोजी यशस्विनीच्या गुन्ह्यात दुसऱ्यांदा अटक.
- ११ नोव्हेंबर २०२४ रोजी मुलगा, सुनेला अटक.

१३ कोटींची संपत्ती निष्पन्न
- एकूण सोळा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला. यात देविदास, सविता अद्यापही कारागृहात असून, अन्य पाच आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे.
- यशस्विनीत जवळपास ७६ कोटींची ठेव आहे. तर अधाने कुटुंबाने यात ४७ कोटी ८२ लाखांचे विनातारण कर्ज घेऊन घोटाळा केला.
- पोलिसांनी आत्तापर्यंत एकट्या अधाने कुटुंबाची २३ कोटींची संपत्ती शोधून काढली आहे. त्यापैकी १० कोटी आदर्शच्या संपत्तीत जोडली आहे.

सुनेचा दोष काय ?
सुनेचे नाव श्वेता. ती मूळ मुंबईची. तिचे २०२१ मध्ये राजेशाही थाटात शहरातच पवनशी लग्न झाले. घोटाळा उघडकीस आला तेव्हा श्वेता गर्भवती होती. त्यानंतर मूल झाल्याने तिच्याविषयी काहीशी सहानुभूती होती. सध्या तिचे मूल ८ महिन्यांचे आहे. लग्नाच्या वर्षभरात अधानेने सुनेच्या नावाने एक संस्था उघडून त्यावर इतर संस्थेतील पैसे, कर्जाची रक्कम वळती केली. शिवाय, तिच्या वैयक्तिक बँक खात्यातही पैसे वळते झाल्याने तिची अटक क्रमप्राप्त होती.

Web Title: Son, daughter-in-law of Devidas Adhane of Yashaswini Credit Bank arrested in multi-crore scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.