मुलानेच केला जन्मदात्या वडिलांचा खून, आरोपी पोलीसांच्या ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2022 01:46 PM2022-02-07T13:46:17+5:302022-02-07T13:46:53+5:30
बापामुळेच आईने जाळून घेतले, ते आपल्याला व्यवस्थित जेवायला देत नाही. हा राग मनात धरून मुलाने जन्मदात्याचा काटा काढला.
गंगापूर/लिंबेजळगाव : आपल्या बापामुळेच आईने जाळून घेतले ते आपल्याला व्यवस्थित जेवायला देत नाही. हा राग मनात धरून दहेगाव बंगला (ता.गंगापूर) येथील एका मुलाने जन्मदात्या बापाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे मारले. कडूबाळ सोनवणे (५५) असे मृत बापाचे नाव असून अनिल कडूबाळ सोनवणे (२४) असे आरोपी मुलाचे नाव आहे. आरोपीस वाळूज पोलीसांनी ताब्यात घेऊन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
हलाखीची परिस्थिती असलेला सोनवणे परिवार दहेगाव बंगला येथे राहतो. मयत कडूबाळ सोनवणे हे गावापासून काही अंतरावर असलेल्या एका हॉटेलवर आचारी काम करीत असत. परंतु गेल्या काही दिवसांपासून आजारी असल्याने ते घरीच होते. तर त्यांचा मोठा मुलगा सुनील सोनवणे (२८) हा एका हॉटेलमध्ये वेटर म्हणून कामाला होता; त्याच्या कमाईवरच सध्या सोनवणे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. बेरोजगार असलेला दुसरा मुलगा अनिल वडिलांचा अत्यंत लाडका होता. परिस्थिती हालाकीची असून देखील वडील त्याचे लाड पुरवत होते. ते स्वतः स्वयंपाक करून दोन्ही मुलांना खाऊपिऊ घालत असत. मात्र, तुमच्यामुळेच आईने जाळून घेतले, तुम्ही स्वयंपाक व्यवस्थित करत नाही असे म्हणत लहान मुलगा अनिल हा वडिलांसोबत कायम भांडण करीत असे. परंतू मुलगा सुधारेल या आशेने त्याकडे दुर्लक्ष केले गेले.
वडीलांना मारहाण करून तो गेला झोपी
कडूबाळ सोनवणे यांचा मोठा मुलगा सुनील हा शनिवारी (दि.५) सकाळी हा नेहमीप्रमाणे कामावर गेला व रात्री हॉटेलवरच झोपी गेला. तर इकडे घरी असलेला दुसरा मुलगा अनिलने वडील कडूबाळ यांच्यासोबत जेवणावरून वाद घातला. आरडाओरड करून वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून तो झोपी गेला. यात वडील कडूबाळ सोनवणे यांचा मृत्यू झाला. रविवारी ही घटना उघडकीस आली. ग्रामस्थांनी मोठा मुलगा सुनीलला माहिती दिली. तो लागलीच घरी पोहचला. पोलिसांना माहिती देऊन आरोपी अनिलला पोलिसांच्या स्वाधीन केले.
१५ वर्षांपूर्वी आईने स्वतःला जाळून घेऊन आत्महत्या केली होती; आईने वडिलांमुळेच स्वत:ला संपविले होते. वडील मला व्यवस्थित जेवायला देत नव्हते. त्यांच्यामुळेच मला त्यांचा राग होता, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली. पुढील तपास वाळूज पोलीस ठाण्याचे सपोनि. विनायक शेळके हे करीत आहेत.