पादचारी महिलेची सोनसाखळी दुचाकीवर आलेल्या चोराने हिसकावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 05:57 PM2017-08-27T17:57:21+5:302017-08-27T18:05:31+5:30
पंधरा दिवसापूर्वी गुन्हेशाखेने परप्रांतिय मंगळसुत्र चोरट्याच्या मुसक्या आवळल्यापासून शहरातील मंगसुत्र चोरीचे प्रमाण थांबल्याने पोलीस यंत्रणा निवांत असताना सिडको एन-१ येथे २५ आॅगस्ट रोजी एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले.
औरंगाबाद, दि. 27 : पंधरा दिवसापूर्वी गुन्हेशाखेने परप्रांतिय मंगळसुत्र चोरट्याच्या मुसक्या आवळल्यापासून शहरातील मंगसुत्र चोरीचे प्रमाण थांबल्याने पोलीस यंत्रणा निवांत असताना सिडको एन-१ येथे २५ आॅगस्ट रोजी एका पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. यावेळी महिलेने मंगळसुत्र पकडून ठेवल्याने चोरट्यांच्या हाती ३ तोळ्यांपैकी केवळ १ तोळ्याचीच पोत लागली.
याविषयी अधिक माहिती देताना एमआयडीसी सिडको पोलिसांनी सांगितले की, सिडको एन-१ येथील मनीषा उत्तमराव कदम (५७)या २५ ऑगस्ट रोजी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास नातवासह पायी जात होत्या. यावेळी एक दुचाकीस्वार त्यांच्याजवळून पुढे गेला आणि तो पुन्हा विरूद्ध दिशेने आला. या दुचाकीस्वार चोरट्याने मनीषा यांच्या गळ्यातील तीन तोळ्याच्या मंगळसुत्राला हिसका दिला. यावेळी प्रसंगावधान राखून त्यांनी गळ्यातील मंगळसुत्राची अर्धी बाजू घट्ट पकडून ठेवल्याने चोरट्याच्या हाती केवळ एक तोळ्याचा ऐवज लागला. उर्वरित दोन तोळ्याची पोत मनीषा यांच्या हातात राहिली. २५ ते ३० वयाचा हा चोरटा आहे. याप्रकरणी मनीषा यांनी एमआयडीसी सिडको ठाण्यात तक्रार नोंदविली. पोलीस उपनिरीक्षक सुभाष चव्हाण तपास करीत आहेत.