तहसीलदार बापाच्या गाडीतून मुलगा सुसाट; अंबर दिवा लावून सायरन वाजवत शायनिंग अंगलट

By सुमित डोळे | Published: August 24, 2023 03:59 PM2023-08-24T15:59:23+5:302023-08-24T16:01:51+5:30

ना वाहन परवाना, ना गाडीची पासिंग; पोलिस दिसताच पळण्याचा प्रयत्न

Son Susat from Tehsildar father's car; shining by Amber lights, sirens sounds | तहसीलदार बापाच्या गाडीतून मुलगा सुसाट; अंबर दिवा लावून सायरन वाजवत शायनिंग अंगलट

तहसीलदार बापाच्या गाडीतून मुलगा सुसाट; अंबर दिवा लावून सायरन वाजवत शायनिंग अंगलट

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : तहसीलदार वडिलांना मिळालेले शासकीय वाहन मोठ्याने सायरन वाजवत अंबर दिव्यासह मुलगा स्वत:च्या मालकीची असल्यासारखा फिरवत होता. कॅनॉट प्लेसमध्ये मध्यरात्री पोलिसांना संशय आल्याने त्याला थांबण्याचा इशारा करताच त्याने वाहन उलट दिशेने धोकादायकरीत्या पळवण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पाठलाग करून पकडल्यानंतरही अधिकाऱ्याच्या मुलाचा तोरा कायम होता. पोलिसांनी खाकीचा इंगा दाखवत त्याला वाहनासह ठाण्यात नेत वाहन जप्त केले.

मंगळवारी रात्री एक वाजता सिडको पोलिस ठाण्याच्या सहायक निरीक्षक श्रध्दा वायदंडे, अंमलदार जीवन शेजवळ, सुरेश वाकळे गस्तीवर होते. एक वाजता कॅनॉट प्लेसमध्ये त्यांना अंबर दिवा व सायरन वाजणारी पांढरी बोलेरो तीन मुले सुसाट व बेदरकारपणे फिरवताना दिसली. त्यांनी पाठलाग करताच तरुणाने धोकादायकरीत्या जीप वेगात वळवून उलट दिशेने पळवली. शेजवळ, वाकळे यांनी पाठलाग करून त्यांना अडवले. पोलिसांनी उतरण्यास सांगताच तरुणाने जीप सोयगावचे तहसीलदार मोहनलाल रेशमाजी हरणे यांची असल्याचे सांगितले. त्याच्याकडे ना वाहनाची कागदपत्रे होती, ना वाहन परवाना. 

वायदंडे यांनी निरीक्षक गीता बागवडे यांना हा प्रकार कळवून युवकांसह जीप ठाण्यात नेली. हरणे यांचा मुलगा गौरवकुमार (२३, रा. हर्सूल), मानव महेश बंब (२१, रा. गादिया पार्क) व अभिजित ताठे (२१, एम - २) हे या वाहनात होते. मानव जीप चालवत होता. मात्र, त्याच्याकडेही वाहन परवाना नव्हता. रात्र गस्तीवरील निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी वायदंडे यांना जीप जप्त करून मुलांना बुधवारी हजर राहण्याचे समजपत्र देण्याचे आदेश दिले. पोलिसांनी संपर्क साधला असता हरणे यांनी त्यांच्या वाहनाची पासिंग झाली नसल्याने घरी ठेवल्याचे स्पष्टीकरण दिले.

काय आहेत नियम ?
-नियमाप्रमाणे अधिकाऱ्याला कार्यक्षेत्राबाहेर त्याचे सरकारी वाहन वापरता येत नाही.
-नियुक्त चालकाव्यतिरिक्त अन्य कोणालाही, कुटुंबातील सदस्यांनाही शासकीय वाहन वापरण्याचा अधिकार नाही.
-अधिकारी वाहनात नसेल तर अंबर व सायरन खाली काढून चालकाला ते चालवणे बंधनकारक असते.

 

 

Web Title: Son Susat from Tehsildar father's car; shining by Amber lights, sirens sounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.