सोनाली तर प्रियकरासोबत सापडली; मग जाळून मारलेली महिला कोण ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:52 AM2019-06-07T11:52:05+5:302019-06-07T11:56:45+5:30

पिसादेवी शिवारात जळलेल्या अवस्थेत सापडलेल्या मृतदेहाचे रहस्य वाढले

Sonali escaped with lover; Then who was burned women ? | सोनाली तर प्रियकरासोबत सापडली; मग जाळून मारलेली महिला कोण ?

सोनाली तर प्रियकरासोबत सापडली; मग जाळून मारलेली महिला कोण ?

googlenewsNext
ठळक मुद्देसोनाली शिंदे व तिचा प्रियकर पोलिसांच्या ताब्यात सोनाली आणि तिच्या प्रियकरानेच हा खून केल्याचा, पोलिसांना संशय आहे.

औरंगाबाद : प्रियकरासह पळून जाऊन गुलछर्रे उडविणाऱ्या सोनाली शिंदे आणि तिच्या प्रियकराला चिकलठाणा पोलिसांनी गुरुवारी ताब्यात घेतले खरे; परंतु यामुळे सावंगी बायपासनजीकच्या पिसादेवी शिवारातील शेतात २४ मे रोजी सकाळी जळालेल्या अवस्थेत सापडलेला महिलेचा मृतदेह कुणाचा, तिचा खून कुणी केला, कशासाठी केला, मृतदेहाची ओळख एका झटक्यात कशी पटली, असे अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे राहिले आहेत. एखाद्या रहस्यमय चित्रपटात शोभून दिसावा, अशा गूढ गुन्ह्याची उकल करण्यासाठी पोलीस सरसावले आहेत. 

पिसादेवी शिवारातील शशिकला सखाराम चव्हाण यांच्या शेतात २४ मे रोजी एका अनोळखी ३० वर्षीय महिलेचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पोलिसांना सापडला होता. अमोल वाडकर (रा. जाधववाडी) याने हा मृतदेह त्याची बहीण सोनाली सदाशिव शिंदे हिचा असल्याचे सांगत झटपट ओळख पटविली. त्यामुळे पोलिसांना हायसे वाटले. अमोलच्या तक्रारीवरून सोनालीचा पती सदाशिवविरुद्ध खुनाचा गुन्हाही दाखल होऊन पोलिसांनी त्याला अटक केली व पोलीस कोठडीही घेतली. 

पोलिसांची पद्धतशीर दिशाभूल
पोलिसांना मृतदेहाजवळ आणि सोनालीच्या घरातून प्रत्येकी एक चिठ्ठी सापडली होती. त्या चिठ्ठीत नवरा लैंगिक छळ करतो, असा आशय होता. त्यावरून हा खून सोनालीच्या पतीनेच केला असावा, असा कयास पोलिसांनी बांधला; परंतु आठ दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलीस सदाशिवकडून खुनाचा गुन्हा वदवून घेऊ शकली नव्हती. त्याच्या वागण्या, बोलण्यातून तो सत्य असावा, असा निष्कर्ष पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, अप्पर अधीक्षक गणेश गावडे, उपअधीक्षक डॉ. विशाल मेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन सहायक निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सहायक निरीक्षक महेश आंधळे, उपनिरीक्षक आसमान शिंदे यांनी या घटनेचा तपास सुरू केला; परंतु सत्य घटना समोर येत नव्हती. सातवी-आठवीपर्यंत जेमतेम शिक्षण झालेल्या सोनालीचे एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याची कुणकुण पोलिसांना लागली होती. शेवटी पोलिसांना क्ल्यू मिळाला व प्रियकरासह पलायन केलेल्या सोनालीला त्यांनी ताब्यात घेतले. पोलिसांच्या तपासाची दिशाभूल करण्यासह या गुन्ह्यात पतीला अडकविण्यासाठी सोनालीने त्या दोन चिठ्ठ्या लिहिल्याचे घाटत आहे. 

अनेक प्रश्नांमुळे पोलीस चक्रावले
सोनाली जिवंत असल्यामुळे जळालेल्या अवस्थेत सापडलेला मृतदेह कुणाचा, असा प्रश्न पोलिसांना पडला आहे. ती महिला त्या शेतात कशी गेली, तिला कुणी जाळले, मारले, या दिशेने आता पोलिसांनी तपास सुरू केला आहे. तो मृतदेह माझ्या बहिणीचाच असल्याचे वाडकर याने सांगत ओळख पटविली होती. ती कशाच्या आधारावर, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. सोनालीचे कपडे, चपला किंवा अन्य काही ओळखची खूण त्याने पाहिली होती का, त्याने कशाच्या आधारावर ओळखून मृतदेह घरी  आणला व त्यावर अंत्यसंस्कार केले, असे  अनेक प्रश्न पोलिसांना पडले आहेत.

कुणी घडविले हत्याकांड
- पतीला अडकविण्यासाठी सोनाली आणि तिच्या प्रियकरानेच हा खून केल्याचा, पोलिसांना संशय आहे. त्यांची कसून चौकशी केली जात आहे. कारण मृतदेहाजवळही एक चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. दोन्ही चिठ्ठीतील मजकूर व अक्षरे मिळतीजुळती असल्याचे समजते. 
- आपल्या प्रेमातील अडसर असलेल्या पतीला दूर करण्यासाठी सोनाली व तिच्या प्रियकराने हा सुनियोजित कट रचला. त्यासाठी सोनालीने दोन चिठ्ठ्या लिहून पतीच्या त्रासाचा त्यात उल्लेख केला. त्यानंतर सिडको बसस्थानक परिसरातून एका वारांगनेला सोबत नेऊन तिचा खून करण्यात आला. 
- मृतदेहाची ओळख पटू नये, यासाठी तो चेहरा जाळून विद्रूप करून हे दोघे पळून गेले असावेत, असा घटनाक्रम पोलिसांनी जुळविला आहे; परंतु याला अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला नाही. तरीही अनेक प्रश्न पोलिसांसमोर उभे आहेत.

Web Title: Sonali escaped with lover; Then who was burned women ?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.